नाशिक – राज्यातील वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे, रसायन शास्त्रज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, अभिनेते प्रशांत दामले, सतारवादक उस्ताद उस्मानखान, गिर्यारोहक आशिष माने यांच्यासह सहा जणांना येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले.
सोमवारी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश होळकर, सहकार्यवाह राजेंद्र डोखळे, अजय निकम यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी माजी पदाधिकारी ॲड. विलास लोणारी, लोकेश शेवडे हेही उपस्थित होते. प्रतिष्ठानतर्फे १९९२ पासून दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे स्वरुप रुपये २१ हजार, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. यंदाचा हा १८ वा पुरस्कार आहे. लोकसेवा, चित्रपट-नाट्य, क्रीडा-साहस, ज्ञान-विज्ञान, चित्र-शिल्प, संगीत-नृत्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
पुरस्कारार्थी अभिनेते सयाजी शिंदे हे सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणासाठी काम करतात. तपोवनातील गाजलेल्या वृक्षतोड प्रकरणात त्यांनी झाडे वाचविण्यासाठी भूमिका घेतली. नामांकित रसायन शास्त्रज्ञ तथा संशोधक डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी कोल्हापूरचा रंकाळा तलाव आणि भुवनेश्वर येथील बिंदुसागर तलावासाठी शुध्दीकरण तंत्रज्ञान विकसित केले. पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे संकल्पन आणि चित्रकला यात चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सतारवादक उस्ताद उस्मानखान यांनी सतार वादनातील गायकी अंग आणि तंत अंग या दोन्ही प्रकारांचे सुरेख मिश्रण करून आपली स्वतंत्र शैली निर्माण केली आहे. नाट्यक्षेत्रात प्रशांत दामले यांनी अनेक विक्रम केले आहेत. तर मूलभूत पर्वतारोहण अभ्यासक्रम करणारे आशिष माने यांनी आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची पाच शिखरे सर केली आहेत.
कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता गंगापूर रस्त्यावरील रावसाहेेब थोरात सभागृहात या पुरस्कारांचे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कारांची निवड प्रतिष्ठानच्या आजी-माजी विश्वस्तांनी केली.

