नंदुरबार – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांनी बुधवारी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नवापूर येथे त्यांचे निधन झाले.. महाराष्ट्राच्या मंत्रिमडंळात अनेक खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भूषविले होते. सुरुपसिंग हे पक्के गांधी परिवाराचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. १९८५ पासून ते सातत्याने विधानसभेत पोहचले. २००९ मध्ये पराभव झाल्यानंतर २०१२ च्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा ते विजयी झाले होते. ती त्यांची शेवटची निवडणूक ठरली.

नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल भागाला काँग्रेसचा बालेकिल्ला बनविणारे सुरुपसिंग नाईक यांच्यावर काही दिवसांपासून मुंबई, बार्डोली आणि नंतर नवापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सुरुपसिंग नाईक यांचा जन्म १० सप्टेंबर १९३८ साली नवापूर तालुक्यातील नवागाव या आदिवासी लोकवस्तीच्या लहानशा गावात झाला. आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात त्यांनी १९६२ मध्ये नवापूर तालुक्यातील सुकवेल ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरु केली.

१९६५ साली ते धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले. १९७२ साली नवापूर विधानसभा मतदारसंघात ११ मार्च १९७२ साली मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आणीबाणीचा काळात त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मार्च १९७७ साली प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकिट मिळाले. १९८० साली त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आणि ते लोकसभेत पोहचले. इंदिरा गांधीनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना २५ सप्टेंबर १९८० रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली. मंत्री झाल्यावर त्यांना समाजकल्याण व आदिवासी विकास खाते देण्यात आले. तेव्हापासून २००९ पर्यत सातत्याने ते नवापूर मतदारसंघातून विधानसभेत पोहचले. या कालावधीत आदिवासी विकास, समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वन व बंदरे अशा अनेक खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भूषविले.

२००९ मध्ये डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावितांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला. मात्र पराभवाने न खचता न थकता त्यांनी जिद्दीने लढा देत २०१४ मध्ये शरद गावितांनाच पराभूत करत ते पुन्हा विधानसभेत पोहचले . २०१९ आणि २०२४ मध्ये त्यांचे पुत्र शिरीष नाईक यांनी काँग्रेसच्या माध्यमातून या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. आपले जुने सहकारी दिवंगत माणिकराव गावित यांच्याबरोबर सुरुपसिंग यांनी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात शिक्षण संस्थेचे जाऴे विणले. आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे येथे सुरु केला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक योजना आणि विकास कांमामध्ये त्यांचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे.

त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, पाच मुलगे, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुत्र शिरीष नाईक हे नवापूरचे विद्यमान आमदार आहेत. सून रजनी नाईक यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. गांधी घराण्याचे अतिशय निष्ठावंत राहिलेल्या सुरुपसिंग नाईक यांच्यासाठी इंदिरा गांधी यांनी खांडबाऱ्यात सभा घेतली होती. आणीबाणीनंतर नेत्यांची पळवापळव सुरु असतांना लोकसभेवर निवडून आल्यानंतर रात्रीतून दिल्ली गाठून रात्रभर इंदिरा गांधी यांच्या गार्डनमध्ये सुरुपसिंग नाईकांनी मुक्काम ठोकला होता. सकाळी उठल्यानतंर इंदिरा गांधी यांना त्यांचे दर्शन झाले. आपणासही पळविण्यात येण्याच्या भीतीने आपण दिल्ली गाठल्याचे सांगणाऱ्या सुरुपसिंग नाईकांच्या निष्ठेवर इंदिरा गांधी भलत्याच खुष झाल्याची चर्चा आजही नंदुरबारमध्ये रंगते. त्यांच्या निधनाने नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजीक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.