नाशिक – काही महिन्यांपूर्वी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार संघर्ष झाला होता. त्याची पुनरावृत्ती आता विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवरून होत आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत भाजपचे अधिक संख्याबळ आहे. एखाद्या महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन शिंदे गटाच्या ताब्यातून नाशिकची जागा सोडवून घेण्याची जोरदार तयारी भाजपने चालविल्याने शिंदे गटातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
महायुतीत विधान परिषदेच्या राज्यातील बहुसंख्य जागांवर मतैक्य झाल्याचे सांगितले जात असले तरी भाजप आणि शिंदे गटात नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन जागांबाबत चर्चा सुरू असल्याचे अधोरेखीत केले होते. महायुतीत सकारात्मक चर्चा झाली असून भाजपला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यापैकी एक जागा हवी असल्याचे त्यांनी सूचित केले. मागील वेळी एकसंघ शिवसेनेकडून नरेंद्र दराडे हे नाशिकमधून निवडून आले होते. नंतर ते शिंदे गटात दाखल झाले. शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे यांच्यासह अंजुम कांदे, पक्ष सचिव भाऊसाहेब चौधरी, मनपा गटनेते अजय बोरस्ते आणि विजय करंजकर हे स्पर्धेत आहेत. शिंदे गटाच्या राज्यातील शिवसंवाद दौऱ्याची सुरूवात अलिकडेच नाशिकमधून झाली. तेव्हा पक्षांतर्गत बैठकीत खा. श्रीकांत शिंदे यांनी देखील ही जागा शिवसेनेकडेच राहण्याचे सुतोवाच करीत तयारीला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. पक्षातून नरेंद्र दराडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध झाला. आमदार असूनही त्यांचा पक्षाला उपयोग झाला नसल्याच्या तक्रारी झाल्या. शिंदे गटातील सर्व इच्छुक तिकीट मिळविण्यासाठी इर्षेने स्पर्धेत उतरले असताना भाजपच्या प्रस्तावाने आता त्यांची धाकधुक वाढली आहे. शिंदे गटातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाशिकची जागा पक्षाला मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली.
प्रस्ताव काय?
छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला देऊन नाशिकची जागा भाजपला सोडण्याचा प्रस्ताव मांडला गेल्याचे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून सांगण्यात आले. शिंदे गटाला नाशिकच्या जागेच्या मोबदल्यात एखाद्या महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले जाईल. दोन्ही पक्षातील चर्चेत जळगावच्या जागेचा कुठलाही विषय नव्हता. कारण, जळगावची जागा मूळ भाजपची असून ती पक्षाकडेच राहील, असे संबंधितांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून गणेश गिते, निलेश बोरा, सुरेश पाटील, बापू पिंगळे यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. नाशिक मतदारसंघातील पक्षीय संख्याबळाचा विचार करता भाजपचे १६४, शिंदे गटाचे १५९, ठाकरे गट ४७, राष्ट्रवादी शरद पवार गट १६, इस्लाम पक्षाचे ३५ आणि अन्य ५९ अशी स्थिती आहे. आपले वर्चस्व असल्याचा दाखला देत भाजपने शिंदे गटाकडून ही जागा स्वत:कडे घेण्याची जोरदार तयारी केली आहे.
