नाशिक - मनोज जरांगे यांना काय लेखी आश्वासन दिले माहिती नाही. आता गळ्यात हडूक अडकल्यावर विरोधी पक्षाची आठवण आली का ? उगाच आमच्यावर खापर फोडु नका, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला दिला आहे. वडेट्टीवार हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री १५०० कोटी शेतकऱ्यांना दिल्याचा दावा करत असताना प्रत्यक्षात चार हजार कोटी दिले. महाराष्ट्राला दुय्यम वागणूक दिली जात आहे. निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. सध्या राज्यातील नेत्यांचे गुजरात प्रेम सर्वांना दिसत आहे. वेगवेगळे प्रकल्प, काम पळवले जात आहे. महाराष्ट्राला गुजरातकडे गहाण ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. महायुतीतील प्रत्येक पक्षाला तिजोरी ओरबाडून घ्यायची आहे. तीन्ही पक्षाच्या आमदारांना पैसे कसे वाटता येतील, यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीने कितीही प्रयत्न केले तरी जनता त्यांना संधी देणार नाही. सत्ताधारी आमदार माणिक कोकाटे यांनी मंत्र्यांवर केलेल्या टिकेत काही चुक नाही. राज्यात आजवर असे भ्रष्टाचारी सरकार झाले नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.