पाणी, जमीन देऊनही न्याय मिळत नसल्याची इगतपुरीकरांची भावना

तालुक्यासाठी जीवनदायी समजल्या जाणाऱ्या भावली धरणातून ठाणे जिल्ह्य़ाच्या शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त ९७ गावे व पाडय़ांसाठी पाण्याचे आरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तालुक्यावर पुन्हा एक शासननिर्मित समस्या उभी राहिली आहे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्यास विरोध होत असतानाही शासन बळजोरी करीत असल्याने त्याविरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरू असताना त्यात भावली धरणातील पाण्यावरील आरक्षणाची भर पडली आहे. या धरणातील पाण्यावर मराठवाडय़ासाठी यापूर्वीच आरक्षण असताना पुन्हा दुसरे आरक्षण टाकण्यात आल्याने वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.

इगतपुरी तालुक्यात हे धरण असूनही तालुक्यातील सिंचन, घोटी, इगतपुरीसाठी पाण्याचे आरक्षण किती, हा प्रश्न अधांतरित आहे. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या पाणीपुरवठा योजनेची मदारही आता इगतपुरी तालुक्यावर आली असली तरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सिंचन व उपसा योजनेसाठी या धरणातून विशेष प्रगती झालेली नाही. या धरणातील पाण्यावर घोटी व इगतपुरीसह इतर गावांना पिण्याच्या पाण्याचे आरक्षण किती, या धरणातील सिंचन पाणी योजनेचे नियोजन काय, इगतपुरी तालुक्यासाठी पाणी आरक्षणाचे प्रमाण किती, याबाबत प्रशासकीय स्तरावर ठाम असे नियोजन नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

इगतपुरी तालुक्यात अनेक लहान-मोठी धरणे असल्याने या धरणांमधून कायमच पाण्याची पळवापळवी होते. दारणा धरण समूहातून मराठवाडा, नगरकडे पाणी नेले जाते. तर मुकणे धरणातून सद्य:स्थितीत नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

कडवा धरणातून सिन्नरसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यात आता भावली धरणातून शहापूरसाठी पाणी आरक्षणाची भर पडल्याने इगतपुरी तालुक्याने करायचे काय, भावली धरणालगत असलेल्या गावे, वाडय़ा, पाडय़ांना पाणीपुरवठा योजना कोठून राबविणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

आरक्षणामुळे ४७१ हेक्टर सिंचन क्षेत्रात कपात

शासनाच्या जलसंपदा विभागाने अलीकडेच शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी भावली धरणातील पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. टंचाईग्रस्त ९७ गावे व वाडय़ांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी या धरणातून ४.५५ दलघमी पाणी आरक्षण २०२१ पर्यंत असणार आहे. या पाणी आरक्षणामुळे जवळपास ४७१ हेक्टर सिंचन क्षेत्रात कपात होणार आहे. भावली धरण हे नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पअंतर्गत बांधण्यात आले आहे. या पाण्याच्या जास्तीचा फायदा हा प्राधान्याने मराठवाडय़ासाठी आहे. अवघ्या दीड टीएमसी क्षमतेचे हे धरण बांधल्यापासून पूर्ण क्षमतेने भरले गेले आहे. त्याचाच फायदा घेऊन आरक्षणाच्या नावाखाली मराठवाडा, नगरकडे या धरणाचे पाणी पळविले जात आहे. ज्या तालुक्यात हे धरण आहे त्या इगतपुरीतील गावांना मात्र, याचा लाभ होताना दिसत नाही. या धरणालगत काही अंतरावर घोटी व इगतपुरी या  महत्त्वाच्या गावांना धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी शासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत आहे. परंतु शासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही.