शालेय विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू प्रकरण

शालेय विद्यार्थिनीच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास लावण्याऐवजी पोलीस यंत्रणेने हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दर्शविल्याने बुधवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील भरवस फाटा येथे रास्ता रोको केले.

देवगाव येथे ३० डिसेंबरला मनीषा चोपडे या विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेचा तपास दोन दिवसांत लावण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. परंतु, आठ दिवसांनंतर तपास यंत्रणेने ही आत्महत्या असल्याचा दावा केला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला.

गावातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील भरवस फाटा येथे तासभर रास्ता रोको केले. हजारो ग्रामस्थ त्यात सहभागी झाले होते.

आंदोलकांनी नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गिरे यांना निवेदन दिले. याआधी ग्रामस्थांनी मोर्चा काढून बंद पाळला होता. मनीषाने आत्महत्या केली नसून तिचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आई-वडील व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

आठ दिवस उलटूनही पोलीस यंत्रणा तपास करण्यात अपयशी ठरल्याने आंदोलनाचा पवित्रा स्वीकारण्यात आला.