नाशिक : सुरू करण्यात आलेले काम त्वरीत पूर्ण न केल्यास त्याचा ग्रामस्थांना कसा फटका बसतो, याचा अनुभव त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथे नदीपात्रावर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामामुळे येत आहे. शिरसगाव ते मुरंबी दरम्यान नदीपात्रावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अतिशय संथपणे करण्यात येत असल्याने वाहनधारक तसेच प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पुलाच्या संथ कामामुळे हाकेच्या अंतरावरील गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना १० ते १५ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.

हरसूल भागातील शिरसगाव – मुरंबी हा मुख्य रस्ता असून भागओहळ, बालापाडा यासह इतर गाव, पाडय़ांना जोडणारा हा रस्ता आहे. या भागात दळणवळणाची सोय व्हावी. यासाठी नदीपात्रावरील पुलाची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात आ. हिरामण खोसकर यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मनमानीमुळे अद्यापही पुलाचे काम पूर्ण झाले नसून अतिशय संथपणे काम करण्यात येत आहे.

पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. हरसूल भागात मागील आठवडय़ापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात आलेल्या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे या पुलापासून हाकेच्या अंतरावर शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने या केंद्राचा परिसरातील उपकेंद्र तसेच ग्रामस्थांचा नित्याने या ना त्या कामामुळे संबंध येतो. यामुळे सोयीस्कर असलेल्या रस्त्याऐवजी आता हेलपाटे मारत हरसूल अथवा शिरसगाव गाठावे लागत आहे. यामुळे मानसिक त्रास होत असून वेळही वाया जात आहे.

पुलाच्या कामाची अवस्था बिकट
पावसाचा जोर वाढल्यास नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाची अवस्था बिकट होण्याची शक्यता नाकारता नाही. या पुलामुळे हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी १० ते १५ किलोमीटरचे अंतर अधिक कापावे लागत आहे. रात्रीच्या सुमारास गाव पाडय़ात एखादी दुर्घटना घडल्यास अथवा प्रसूती, विषबाधा, सर्पदंश सारख्या घटनांसाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. परिसरातील ग्रामस्थांचे, वाहनधारकांचे नुकसान टाळण्यासाठी नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाला गती देण्यात यावी, लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यां भारती भोये, सरपंच कल्पना महाले यांनी केली आहे.