नाशिक – राज्य शासनाच्या वतीने चौथे विश्व मराठी संमेलन २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत येथे होत आहे. यानिमित्ताने पुरस्कार वितरणासह तीन दिवस होणाऱ्या साहित्य जागरमध्ये बोलीभाषा, साहित्य, लोककला यांचे विविध पैलु उलगडणारे कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे.

संमेलनास २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता के. टी. एच. एम महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या कुसुमाग्रज साहित्य नगरीमधून प्रारंभ होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ या जिल्ह्यातील मंत्र्यांसह महापौर हिमगौरी आडके उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात साहित्य भूषण पुरस्काराने डॉ. भालचंद्र नेमाडे तर, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने श्रीनिवास कुलकर्णी, विश्व मराठी संंमेलन विशेष पुरस्काराने शांतिब्रह्म मारूतीबाबा कुरेकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनाचा समारोप एक मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत होणार आहे.

संमेलनात बोलीभाषा, साहित्य, लोककला यांचे विविध पैलु उलगडणारे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, मुलाखत, परिसंवाद महाकवी कालिदास नाट्यमंदिर, रावसाहेब थोरात सभागृह, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आवारात होणार आहेत. संमेलनात गुरूवारी सकाळ सत्रात मराठी बोलींच्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यक मधु मंगेश कर्णिक, डॉ. सदानंद मोरे, डॉ. मिलींद जोशी, ॲड. नितीन ठाकरे, डॉ. श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत होईल. दिवसभरात बहिणाबाईंची गाणी व कविता यावरील अरे संसार संसार कार्यक्रम , बोहाडा, अहिराणी गीतांचा कार्यक्रम, झाडीपट्टी, आराधी लोकनृत्य आणि लोकगीते, जागर शिवबाचा आदी कार्यक्रम होणार आहेत.

२७ रोजी मुख्य उद्घाटन सोहळ्यानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रा काढण्यात येईल. के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या आवारात शोभायात्रेचा समारोप होईल. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत पुरस्कार वितरण, पुरस्कारार्थींचे चर्चासत्र होईल. सायंकाळी राहुल देशपांडे यांचा सांगितीक कार्यक्रम होईल. २८ रोजी मनाचे श्लोक, पालखी व जखी , समाजमाध्यमांवरील मराठी यासह विविध विषयावर परिसंवाद होणार आहेत. तसेच रावसाहेब थोरात सभागृह परिसरात मराठी माध्यम शाळा सक्षमीकरण, कृत्रीम बुध्दिमत्तेचा मराठीतील वापर, मराठी प्रकाशनांचे बदलते प्रवाह आदी विषयावर व्याख्यान होईल. संमेलन समारोप सत्रात मल्लखांब प्रात्यक्षिक, मराठी बालसाहित्य, समृध्द मराठी, काव्य संमेलन, कलारत्न पुरस्कारासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.