नाशिक – कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अद्ययावत आणि विकसित आवृत्तीमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षा मोठ्या प्रमाणात रुंदावल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेत माहितीचे स्वयंचलन, भाषा कौशल्य, अचूकता असे अनेक फायदे आहेत. या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा आणि विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन अमेरिकेतील राज्य प्रतिनिधी, आमदार संतोष साळवी यांनी केले.
चौथ्या विश्व मराठी संमेलनात शनिवारी रावसाहेब थोरात सभागृहात कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठीतील वापर या विषयावर परिसंवाद झाला. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जग जवळ आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात एक संधी म्हणून प्रभाव पडला आहे. मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी इतर भाषांना सामावून घेऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. एआयची भीती न बाळगता त्याचा प्रभावीपणे व अचुक वापर करण्याचे आवाहन साळवी यांनी केले.
सुनील खांडबहाले यांनी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी विविध साधनांचा वापर करुन आपण विकसित होण्याची आवश्यकता मांडली. मराठी भाषेमध्ये एआयचा वापर करावयाचा असेल, तर डिजिटल विदा आवश्यक आहे. त्यासाठी भावनिक बुध्दिमत्ता एआयमध्ये आणण्यासाठी प्रभावी उपाय गरजेचे आहेत. एआय म्हणजे एक यंत्र असून ते माणसासारखे विचार करते. त्यामुळे प्रत्येकाने एआय शिकण्यासाठी स्वत:ला त्याप्रमाणे विकसित करायला हवे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन वापर करावा, असे त्यांनी सांगितले. निवृत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या जगात भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि ती अधिक समृद्ध व संपन्न करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. सायबर सुरक्षा सक्षम करण्यासाठी एआयची जोड देण्यात येत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांवर वेळीच आळा घालणे सोईस्कर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सचिन जोशी यांनी एआय वापराविषयी विविध उदाहरणे देत प्रात्याक्षिकद्वारे माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाला भावनेची जोड दिल्यास तंत्रज्ञान वापरणे अधिक सुलभ होईल. एआयचा वापर तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सूचित केले.
वैभव शेळके यांनी एआय हे आपल्यासाठी मार्गदर्शकाचे काम करत आहे. मराठी ज्ञानप्रणाली अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठीचा वापर एआयमध्ये सुकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रामास मराठी भाषा विभागाच्या पर्यवेक्षक वैशाली वाघमारे, कक्ष अधिकारी विशाखा दातार यांसह विद्यार्थी उपस्थित होते. एआय बाबत उपस्थितांनी विचारलेल्या शंका व समस्याबाबत तज्ज्ञांनी उत्तरे देवून संवाद साधला.
