नाशिक – चौथ्या विश्व मराठी संमेलनात शनिवारी आयोजित ‘मराठी माध्यम शाळा सक्षमीकरण’ या अतिशय महत्वाच्या विषयावरील परिसंवादात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे सहभागी होणार असल्याने सभागृह गर्दीने भरलेले राहील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, मंत्री भुसे शेवटपर्यंत आलेच नाहीत. त्यांच्या गैरहजेरीतच विविध मुद्यांवर चर्चा झाली.

राज्य शासनाच्या वतीने आयोजित चौथे विश्व मराठी संमेलन के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात निर्मिलेल्या कुसुमाग्रज साहित्य नगरीत सुरू आहे. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास शिक्षणमंत्री दादा भुसे हे अनुपस्थित होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी संमेलनात रावसाहेब थोरात सभागृहात मराठी माध्यम शाळा सक्षमीकरण या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील वाबळेवाडी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय वारे आणि आदिवासी भागात ३६५ दिवस शाळा चालवणारे केशव गावित यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परिसंवादात शिक्षणमंत्री दादा भुसे यांचाही सहभाग निश्चित होता. शिक्षणमंत्री येणार म्हणून सकाळपासून कार्यक्रस्थळी बंदोबस्तासाठी पोलीस फौजफाटा तैनात होता. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांनी सभागृह तुडुंब भरले होते. परिसंवादात सुमारे दीड तास चर्चा झाली. मात्र शिक्षणमंत्री भुसे हे शेवटपर्यंत आलेच नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीविषयी व्यासपीठावरून कुठलेही कारण दिले गेले नाही. मराठी भाषा विभाग अर्थात राज्य शासनाचा हा कार्यक्रम आहे. अधिवेशन सुरू असल्याने शिक्षणमंत्री भुसे आले नसावेत, अशी कुजबूज सुरू होती. अधिवेशनामुळे अनेक मंत्र्यांना संमेंलनात सहभागी होता आले नसल्याचे सांगितले जाते. मराठी माध्यमांच्या शाळांवरील या परिसंवादात सहभागी होण्याचे भुसे यांनी आधी मान्य केले होते. परंतु त्यांच्या अनुपस्थितीचे कारण कोणालाही सांगता आले नाही.

पालकांची मानसिकता बदलण्याची गरज

शालेय विद्यार्थ्यांची क्षमता, कल लक्षात घेऊन त्याला तशी वातावरण निर्मिती करून संधी उपलब्ध करणे आवश्यक असते. मात्र बहुसंख्य पालक आपल्या पाल्याकडे सर्वात बुद्धिमान, शक्तिमान म्हणून बघतात. अशा पालकांना आवरणे कठीण होते. विद्यार्थ्यांपेक्षा आज पालकांना शिकवण्याची नितांत आवश्यकता आहे. मुलांच्या प्रगतीसाठी पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे असून ते प्रगल्भ झाल्यास अनेक समस्या कमी होतील, असे मत शिक्षक दत्तात्रय वारे आणि केशव गावित यांनी मांडले. पालकांची मानसिकता बदलण्यासाठी वाबळेवाडीत राबविलेल्या उपक्रमांचे दाखले वारे यांनी दिले. राज्यातील शाळांमध्ये अनेक प्रयोग होतात. या संधीचे रुपांतर विद्यार्थ्याच्या वैयक्तिक कामगिरीत व्हायला पाहिजे. तिथे कमी पडतात. विद्यार्थ्यांमधील कौशल्याचे रुपांतर विद्यार्थ्याच्या कामगिरीत व रोजगार निर्मितीत होणे शासनाकडून अपेक्षित आहे. शिक्षक व्यापक स्वरुपात यासाठी काम करू शकतो. प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी शाळेत व्यवस्था नसेल तर तिला परिपूर्ण शाळा म्हणता येणार नाही. दहावीत काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. कारण त्यांचा पाया मजबूत नसतो. इयत्ता पहिलीपासून व्याकरण व आवश्यक बाबींकडे आपल्या शाळांमध्ये कसे लक्ष दिले जाते याची उदाहरणे वारे आणि गावित यांनी दिली.