नाशिक – ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्या नाशिक नगरीत चौथे विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. संमेलनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. नाशिकच्या वैभवात भर घालेल, असे संमेलन होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आय. एम. आर. टी. सभागृहात चौथ्या विश्व मराठी संमेलन आयोजनाबाबत राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी रविवारी साहित्यिकांशी संवाद साधला. मंत्री सामंत यांनी संमेलनाच्या तारखाही जाहीर केल्या.
मराठी भाषा व साहित्याचा विकास, जागतिकीकरणाच्या युगातील मराठीची भूमिका, तंत्रज्ञानातील मराठीचा वापर, शिक्षणातील मातृभाषेचे स्थान तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन या विषयांवर विविध परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने व संवाद सत्रांचे आयोजन संमेलनात करण्यात येणार आहे. तसेच कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे, नाट्यप्रयोग, कथाकथन, पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक संवाद तसेच युवा पिढीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी साहित्य, कला व परंपरेचे दर्शन घडविणारी विविध प्रदर्शनेही या निमित्ताने भरविण्यात येणार आहेत.
या संमेलनासाठी परदेशातून साहित्यिक हजर राहणार आहेत. यापूर्वीचे संमेलन पुणे येथे झाले. या संमेलनात पुस्तक आदान -प्रदान हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या संमेलनातही हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात येईल. त्यासाठी नाशिककरांनी आपले योगदान द्यावे. त्यासाठी दहा रुपये वर्गणी ठेवण्यात येईल. या संमेलनाच्या मुख्य मंडपाचे कवी कुसुमाग्रज नगरी असे नामकरण करण्यात येईल. अन्य दालनांना मान्यवरांची नावे देण्यात येतील. मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिन तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला विशेष महत्व असणार आहे.
मराठी भाषा विभागातर्फे ३५ जणांना साहित्य पुरस्कार, विश्व मराठी संमेलनाचा साहित्य भूषण पुरस्कार व नाशिकमध्ये एक विशेष पुरस्काराचे वितरण या संमेलनात करण्यात येणार आहे. २७, 28 फेब्रुवारी आणि १ मार्च या कालावधीत हे संमेलन होईल. संमेलनाच्या पहिल्या दिवशी पुरस्कार्थीची नावे घोषित करण्यात येतील. संमेलनपूर्व २६ फेब्रुवारी रोजी मराठी बोलीभाषांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यात नाटक आमने-सामने सादर होईल.
२७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. सांयकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी पुरस्कार विजेत्यांचा परिसंवाद होईल. २८ फेब्रुवारी रोजी मनाचे श्लोक, लोककला, चित्रपट कार्यशाळा, एआय व मराठी भाषा, वारकरी संप्रदाय साहित्यप्रकार असे कार्यक्रम होणार असून प्रत्येक दिवशी कार्यक्रमांचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी, विश्व मराठी संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, अवर सचिव नितीन डोंगरे, उर्मिला धादवड, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते. प्रा. सायली आचार्य, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. गिरीश पाटील, विश्वास ठाकूर, पियू शिरवाडकर, धनंजय बेळे, श्रीकांत बेणी सतीश बोरा, प्रा. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, दिनेश पैठणकर, सुरेश पवार आदींनी विविध सूचना केल्या.
यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आवारातील मराठी विश्व संमे़लन नाशिक कार्यालयाचे उद्घाटन तसेच मराठी विश्व संमेलनाच्या संकेतस्थळाचे कळ दाबून उदघाटन करण्यात आले.

