नाशिक – डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे माहिती देण्याचा वेग वाढला असला तरी भाषेची शुद्धता, सौंदर्य आणि सांस्कृतिक मूल्ये जपणे तितकेच आवश्यक आहे. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी पॉडकास्ट, व्हिडिओ विविध पर्याय आहेत. जेन झी पिढी मराठीपासून दूर नसून ती मराठीला आधुनिक रूप देत आहे. या पिढीची ऊर्जा आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास मराठी भाषा अधिक प्रभावीपणे जागतिक स्तरावर पोहोचू शकेल, असा विश्वास परिसंवादात व्यक्त करण्यात आला.

येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनात माध्यमातील मराठी भाषा या विषयावर चर्चा झाली. या परिसंवादात महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, आज तक वाहिनीचे साहिल जोशी, ठाणे वैभवचे मिलिंद बल्लाळ, साम टीव्हीचे निलेश खरे, झी २४ तासचे कमेलश सुतार, दिव्य मराठीच्या संपादक दीप्ती राऊत यांनी सहभाग घेतला. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे माध्यमांतील भाषाशैलीत बदल होत आहेत. इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा वाढता वापर मराठीच्या अभिव्यक्तीवर परिणाम करत असून माध्यमांनी याबाबत सजग राहण्याची गरज आहे. संपादक, लेखक किंवा संवादक यांच्याकडे भाषेची जाण, संवेदनशीलता आणि मांडणीची शिस्त असणे आवश्यक असते. एखादा संदेश शेवटच्या घटकापर्यंत स्पष्टपणे पोहोचला की त्या कामाचे खरे मूल्य ठरत असते. अंतिम वापरकर्त्याला त्याचा अर्थ समजला, तरच संवाद यशस्वी मानला जातो. त्यामुळे बोध होणारी, समजण्यास सोपी आणि शुद्ध मराठी वापरल्यास समाजाशी प्रभावी संवाद साधता येतो, असे मत मांडले गेले.

आजच्या काळात एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. माहितीची उपलब्धता वाढली असली तरी वाचकांचा लक्ष केंद्रित ठेवण्याचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे संदेश हा संक्षिप्त, स्पष्ट आणि आकर्षक असणे अधिक गरजेचे आहे. एआयचा उपयोग माणसाची जागा घेण्यासाठी नाही तर काम अधिक परिणामकारक करण्यासाठी करणे आवश्यक आहे, असे मत चर्चेतून पुढे आले. माध्यमांनी मराठी भाषेच्या संवर्धन व प्रसारासाठी सक्रिय भूमिका बजावावी, नव्या पिढीत मराठीबद्दल अभिमान निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला.

दरम्यान, संमेलनात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात हाऊस फुल सारखी स्थिती असतांना परिसंवाद, व्याख्यानास विविध महाविद्यालयातील विद्यार्थी यांना जबरदस्तीने बसविले जात आहे. शिक्षकांना विचारत परिसंवादास उपस्थित विद्यार्थ्यांची ये जा होत आहे.