नाशिक – पुस्तक प्रकाशनापुरता प्रकाशकांची जबाबदारी नाही. प्रकाशनाआधी लेखनातील व्याकरण, प्रमाणभाषा नियम, मुद्रीत शोधन यासह वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. मात्र समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे साहित्य पुस्तकातुन भ्रमणध्वनीत आले आहे. अशा स्थितीत प्रकाशकांपुढे वाचन आणि वाचक संख्या वाढविण्यासह वेगवेगळी आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रकाशन व्यवसायाला राजमान्यता द्यावी, असा सूर मराठी प्रकाशनाचे बदलते प्रवाह या विषयांवर आयोजित परिसंवादात उमटला.
येथील चौथ्या विश्व मराठी संमेलनात रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या परिसंवादात संवादक म्हणून शुभदा फडणवीस यांनी तसेच आपटे ग्रंथालयाच्या सुषमा दातार, ग्रंथाली प्रकाशनाच्या लतिका भानुशाली, बाल साहित्यासाठी दीपक पटवर्धन, प्रकाश पारखी यांनी सहभाग घेतला. भानुशाली यांनी, वाचन अभिरूची जोपासत प्रकाशन व्यवसाय सांभाळावा लागत असल्याचे सांगितले. ग्रंथालीचा जन्म वाचक चळवळीतून झाला आहे. कुठलाही नफा मिळावा यासाठी संस्था काम करत नाही. दिवाळी अंक परंपरा आजतागायात प्रकाशनाच्या वतीने सांभाळण्यात आली. संस्थेच्या संख्यात्मक तसेच गुणात्मक कामात वाढ होण्यासाठी प्रयत्न होत आहे. तरूण पिढी वाचनाकडे वळावी यासाठी काम सुरू आहे. तसेच ज्येष्ठांसाठीही विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. भानुशाली यांनी प्रकाशन व्यवसायातील अडचणींकडे लक्ष वेधले. शब्दकोश ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु, साहित्य, सांस्कृतिक जबाबदाऱ्या ग्रंथाली सांभाळत असून लवकरच दागिन्यांचा कोश येत असल्याची माहिती त्यांनी दिली. वाचकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची दिली.
दातार यांनी, डिजीटल क्रांतीचा ज्येष्ठांवर होणारा परिणामाकडे लक्ष वेधतांना वाचन संस्कृती संपते का अशी भिती व्यक्त केली. वाचनालयाचे वाचक वाढावेत, यासाठी आम्ही बालकांकरिता पुस्तक हंडीचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. बदलत्या जगानुसार आव्हानेही बदलत असल्याचे नमूद केले. ॲड. पटवर्धन यांनी रत्नागिरी येथील रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय १९८ वर्ष पूर्ण करीत असून वाचनालयाचा पाया आर्थिकदृष्टया भक्कम करण्यासाठी काय करता येईल, याविषयी माहिती दिली. वाचनालयास असलेल्या ऐतिहासिक संदर्भा विषयी बोलतांना वाचनालयाचे इंग्रजी नाव असतांना रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले नाव असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. परिसंवादानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला.
दरम्यान, परिसंवादास युवकांची लक्षणीय उपस्थिती राहिली. शहर परिसरातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी प्रदर्शनास उपस्थित होते.
