नाशिक: कविवर्य कुसुमाग्रज नगरीत तीन दिवस सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या समारोपप्रसंगी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी भाषा विभागातर्फे विभागवार दिला जाणारा नवीन पुरस्कार आणि पुढील संमेलनाचे स्थळ जाहीर केले.
येथील मविप्र शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कविवर्य कुसुमाग्रज नगरीत चौथे विश्व मराठी संमेलन पार पडले. संमेलनाचा समारोप निवृत्त सरन्यायाधिश भूषण गवई, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, शिक्षण मंत्री दादा भुसे, दिग्दर्शक जब्बार पटेल, पद्मश्री तारपावादक भिकल्या धिंडा, प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय-अतुल, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला.
या सोहळ्यात तारपावादक भिकल्या धिंडा यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर संगीतकार अजय-अतुल यांना ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी, दृकश्राव्य माध्यमातून मंत्री सामंत यांनी भाषण केले. वैद्यकीय कारणास्तव उपस्थित राहता आले नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. चौथे विश्व मराठी संमेलन नाशिककरांनी यशस्वी केले, अशा शब्दांत त्यांनी नाशिककरांचे आभार मानले. या संमेलनाच्या यशाचा दाखला देताना त्यांनी तीन दिवसांत सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांनी संमेलनाला भेट दिल्याचे सांगितले. संमेलनाशी संबंधित जास्तीत जास्त कामे स्थानिकांना देण्यात आली आणि स्थानिक कलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रमात प्राधान्य दिले गेले. या वर्षीपासून प्रत्येक विभागात ‘मराठी भाषेचा सेवेकरी’ हा पुरस्कार देण्याचे सामंत यांनी जाहीर केले. यासाठी प्रत्येक विभागाला स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. तेव्हाच त्यांनी पुढील विश्व मराठी संमेलन विदर्भात घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा संदर्भ देत पुढील पाचवे विश्व मराठी संमेलन नागपूरमध्ये होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी जाहीर केले. विश्व मराठी संमेलन राज्यात, देशात आणि परदेशात आयोजित करण्याचा शासनाचा मानस आहे. पहिले संमेलन मुंबईत झाले होते, त्यानंतर नवी मुंबई, पुणे आणि चौथे नाशिकमध्ये पार पडले. नागपूरच्या पाचव्या संमेलनानंतर सहावे विश्व मराठी संमेलन परदेशात होईल, असेही त्यांनी सूचित केले. मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आभार मानले. गतवर्षी ६५ कोटींची तरतूद होती, ती अजित पवार यांनी यंदा २६५ कोटी रुपयांपर्यंत वाढवली, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
