नाशिक – चौथ्या विश्व मराठी संमेलनास येथील कविवर्य कुसुमाग्रज नगरीत उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटन सत्रात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर मारुतीबाबा कुरेकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कारार्थींनी पुरस्कार स्विकारल्यामुळे पुरस्काराचे महत्व आणि महात्म्य वाढले असल्याचे सांगितले. गेली काही दशके मराठीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांसोबत तरुण पिढीदेखील मायमराठीची सेवा करण्यासाठी पुढे येत असल्याने मराठी वैभवाचा रथ असाच पुढे जाईल आणि मराठी सारस्वत मराठी भाषेच्या लौकीकात आणखी भर घालतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर यांनी देशातील हजारो तरुणांपर्यंत आध्यात्माचा गोडवा पोहोचविला. त्यांना पुरस्कार प्रदान करतांना धन्यतेची भावना मनात आहे. त्यांचे व्यक्तिमत्व कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे.
भालचंद्र नेमाडेंनी मानवी जीवन आणि मानवी संवेदनांची गुंतागुंत आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेला नवे पंख दिले. श्रीनिवास कुलकर्णी यांनी संवेदनशील आणि विचारप्रधान लेखन केले.
डॉ.दिलीप धोंडगे यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर पीएचडी करून ग्रंथ लिहिले. आपटे वाचन मंदिराने ७० हजारहून अधिक ग्रंथ आणि हस्तलिखितांचे जतन केले.
विनोद कुलकर्णी यांनी मराठी अभिजात भाषा व्हावी यासाठी लाखो पत्र लिहून घेतली. कर्नाटक साहित्य परिषदेने महाराष्ट्राबाहेर मराठीला मान मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव केला.
मराठी भाषा दिनानिमित्त २०२५ चे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, श्री.पु.भागवत पुरस्कार नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्थेस, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.दिलीप धोंडगे आणि आपटे वाचन मंदिर (इचलकरंजी), कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेला सन्मानित करण्यात आले, तसेच २०२४ चे स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुख्य सोहळ्यानंतर मुख्यमंत्री कामानिमित्त बाहेर पडले. यानंतर अन्य पुरस्कारांचे वितरण झाले. नंतर महापौर हिमगौरी आडके, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि इतरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांची समयसुचकता
वारकरी संप्रदायाचे प्रमुख मारूतीबाबा कुरेकर यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात येत असतांना सभा मंडपात वारकऱ्यांच्या १०० हून अधिक समुहाने आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलीस तसेच सुरक्षा रक्षकांनी अटकाव केला. मात्र व्यासपीठावरून वारकऱ्यांना मध्ये येऊ द्या अशी सुचना झाली. तात्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वारकऱ्यांच्या येथे जात त्यांच्याशी चर्चा करत त्यांची बाजु समजुन घेत त्यांच्या सोबत येत पुढे येणे पसंत केले.
