नाशिक – ​शहरातील मविप्र संस्थेच्या प्रांगणात उभारलेल्या कविवर्य कुसुमाग्रज नगरीत आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या समारोप सोहळ्याला हुल्लडबाजीचे गालबोट लागले. संमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोप सोहळ्यानंतर सायंकाळी सात वाजता ‘द फोक आख्यान’ हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी सकाळपासूनच रसिकांची मोठी गर्दी उसळली होती. समारोप सोहळा लांबल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. वक्त्यांनी आपली भाषणे लवकर आटोपती घ्यावीत, यासाठी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रेक्षकांकडून दबाव टाकला जात होता. निवृत्त सरन्यायाधिश भूषण गवई यांच्या भाषणादरम्यानही हाच प्रकार घडला, ज्यामुळे त्यांना आपले भाषण घाईने पूर्ण करावे लागले.

​कविवर्य कुसुमाग्रज नगरीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. याप्रसंगी निवृत्त न्यायमूर्ती भूषण गवई, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत (दृकश्राव्य माध्यमातून), ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठी भाषा विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, तारपावादक भिकल्या धिंडा आदी मान्यवर उपस्थित होते. ​या सोहळ्यात तारपावादक भिकल्या धिंडा यांना गवई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांनी सादर केलेल्या तारपावादनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तसेच संगीतकार अजय-अतुल यांना ‘कलारत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पाच लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अतुल गोगावले यांनी ‘भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची..’ या रचनेतील काही ओळी सादर केल्या.

​यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांची भाषणे झाली. सुरुवातीला उदय सामंत यांनी तर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रफितीद्वारे आपला संदेश दिला. मात्र, भाषणे लांबत गेल्याने ‘द फोक आख्यान’ पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा संयम सुटत गेला. मुख्य सभामंडपाबाहेर असलेल्या पडद्यांसमोरही प्रचंड गर्दी झाली होती. खुर्च्यांची संख्या अपुरी पडल्याने अनेकांना उभे राहावे लागले. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेरीस कुसुमाग्रज नगरीची काही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. ​समारोपीय भाषणासाठी निवृत्त न्यायमूर्ती भूषण गवई उभे राहिले तेव्हा त्यांना प्रेक्षकांची मानसिकता लक्षात आली होती. त्यांनी सुरुवातीलाच तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाची अधिक ओढ आहे, त्यामुळे मी भाषण लांबवून टाळ्या वाजवण्याची पाळी तुमच्यावर येऊ देणार नाही असे मिश्किलपणे नमूद केले. मातृभाषा मराठीतून शिक्षण घेऊनच मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होऊ शकलो. साहित्याला राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. आपल्या राज्यातील कला आणि संस्कृती संतांनी जपली, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांनी कलाकारांना राजाश्रय देऊन त्यांचा सन्मान केला असे सांगितले. साधारण १२ मिनिटांच्या त्यांच्या भाषणादरम्यान प्रेक्षकांनी तीन ते चार वेळा टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून आपला प्रतिसाद दिला.