नाशिक – मराठी विश्व साहित्य संमेलन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. शुक्रवारी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी नाशिकमध्ये सारस्वतांचा हा सोहळा होत आहे. साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीने आपली कार्यक्रम पत्रिका देखील प्रसिद्ध केली. राज्यस्तरावर सर्व शाळा महाविद्यालयांना विश्व मराठी संमेलनाबाबत अधिकृत परिपत्रक काढून तशी माहिती देण्यात आली.
मात्र या संमेलनात संत परंपरेचा विसर पडल्याची तक्रार संत निवृत्तीनाथ देवस्थानचे विश्वस्थ प्रा. अमर ठोंबरे यांनी केली आहे.ज्या नाशिकच्या भूमीने अर्थात त्र्यंबकेश्वर नगरीने निवृत्तीनाथांसारखा महान योगी दिला, सामाजिक समरसतेची सुरुवात ज्या आद्यपिठापासून झाली ते निवृत्तीनाथ आणि संत मंडळ या सर्व गोष्टींचा विसर मराठी विश्व साहित्य संमेलनाला पडला की काय, असा असा प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे प्रा. ठोमरे यांनी म्हटले आहे.
निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू तर आहेच, आध्यात्मिक गुरु देखील आहे. एवढेच नव्हे तर मध्ययुगीन काळात सर्व समकालीन संतांचे ते प्रेरणास्थान होते. त्यांची अभंगगाथा आजही अनेक साधकांना वारकऱ्यांना मार्गदर्शक अशीच आहे किंबहुना ती वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानी आहे. निवृत्तीनाथ संस्थानतर्फे विश्व मराठी साहित्य संमेलनातील कारभाऱ्यांना याची जाणीव एका पत्राच्या माध्यमातून करून दिलेली असताना देखील संमेलनामध्ये कोणतीही दखल याबाबत घेतली गेली नसल्याचा खेद प्रा. डॉ. ठोंबरे यांनी व्यक्त केला.
निवृत्तीनाथ संजीवन समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. इथूनच महाराष्ट्रातील अनेक वारकरी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातील ज्या काही मानाच्या पालखी आहेत, त्यापैकी निवृत्तीनाथांची एक पालखी असते. लाखो वारकऱ्यांचे एक श्रद्धास्थान त्र्यंबकेश्वरला आहे. हे सर्वश्रुत असताना देखील त्याकडे सोईस्करपणे नियोजन समितीने दुर्लक्ष केले. निवृत्तीनाथांच्या नावाने एखादे संत दालन तसेच त्यांची माहिती असणारा त्यांचा जीवनपट त्या ठिकाणी असावा, अशी मागणी करणारे पत्र पंधरा दिवसापूर्वी विश्व मराठी संमेलनाला देण्यात आले होते.
मात्र समितीतील पदाधिकाऱ्याने आश्चर्यकारक उत्तर दिले. तसेच पुढे त्यांनी अशी ही मल्लीनाथी केली की, निवृत्तीनाथांचे साहित्य कोणते आहे ? ज्या प्रांगणामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन भरत आहे, त्या प्रांगणापासून काही फुटांच्या अंतरावर अनेक वर्ष निवृत्तीनाथांच्या नावाने पालख्या आणि दिंड्या चाललेल्या आहेत. त्या पालख्यांचे आणि समस्त वारकऱ्यांचे टाळ मृदुंगाचे ध्वनी इथल्या कारभाऱ्यांना ऐकू आले नाहीत काय, असा प्रश्न डॉ. ठोंबरे यांनी उपस्थित केला.
संमेलनाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत कुठेही परिसंवादाच्या रूपाने किंवा एखाद्या पुरस्काराच्या स्मृतीमध्ये निवृत्तीनाथांचे नाव दिसले नाही ही मोठी खेदाची बाब आहे. जी ग्रंथदिंडी संमेलन आता काढणार आहे, त्या ग्रंथदिंडीचा पहिला मान खऱ्या अर्थाने संतपरंपरेला द्यायला हवा. कारण मराठी भाषेचा पहिला गौरव ज्ञानेश्वरांच्या रूपाने संतांनी केला आणि तिथूनच पुढे खऱ्या अर्थाने मराठीची लोकगंगा सारस्वतांची गंगा आणि ज्ञानगंगा सुरू झाली. मात्र या साऱ्या गोष्टींचा सोयीस्कर विसर संमेलनातील कारभाऱ्यांना पडला. या संमेलनाकडे वारकरी कोणीही फिरकणार नाही असा इशारा डॉ. ठोंबरे यांनी दिला आहे.

