नाशिक -नाशिक येथे चौथ्या विश्व मराठी संमेलनास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कविवर्य कुसुमाग्रज नगरीत सुरूवात झाली. संमेलनात वैचारिक मेजवानीसाठी साहित्य, कला, संस्कृती, खाद्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करण्यासाठी व्यवस्था प्रदर्शन कक्षात करण्यात आली आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरील ३३ दालने असल्याने रसिकांना काय, काय पाहावे, असा प्रश्न पडला आहे.
कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन दिमाखदार झाले. या निमित्ताने दोन कक्षांमध्ये विविध परिसंवाद, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या शिवाय महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकासह विविध विभागांची दालने नागरिकांना माहिती देण्यासाठी सज्ज आहेत. एकूण ३३ विषयांवरील दालने या प्रांगणात सजली आहेत. या दालनांच्या माध्यमातून राज्याचा इतिहास, भाषा, संस्कृती, साहित्य, विज्ञान, कृषी, सामाजिक विकास, कौशल्यविकास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या प्रमुख दालनांमध्ये ऐतिहासिक वारसा स्थळे, पुराभिलेखागारातील मराठी, मुद्रण-प्रकाशन, ग्रंथालय विश्व, संवाद माध्यमे, संस्थात्मक साहाय्य, संस्कृती, दादासाहेब फाळके चित्रनगरी, महासंस्कृती, हिरकणी, खाद्यसंस्कृती, हस्तकला, बोलीभाषा, पर्यटन, कृषी, पशुसंवर्धन व कृषी पूरक उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान व मूलभूत विज्ञान, वस्त्रोद्योग, तंत्रशिक्षण, तंत्रज्ञान व मराठी भाषा, आदिवासी विकास विभाग, कौशल्य ते करिअर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय या दालनांचा समावेश आहे.
या ठिकाणी पैठणी क्लस्टरचा कक्ष आहे. पैठणी साडीचे विविध प्रकार या ठिकाणी असून याशिवाय पैठणीपासुन तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. बृहन महाराष्ट्रच्यावतीने मराठी स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली आहे. संमेलनास आलेले लेखक, कवी, वाचक, लोकप्रतिनिधी यांच्या स्वाक्षरी मराठीत आहे हे कक्षातील भिंतीवर स्वाक्षरी करत तपासले जात आहे. याशिवाय विविध विषयांवरील ग्रंथसंपदा वाचकांना आकर्षित करत असतांना या ठिकाणी अवघ्या पाच मिनिटांत व्यंगचित्र काढून मिळते. मराठी अक्षर असलेले टी शर्ट आणि पिशव्या विक्रीसाठी आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्फत प्रकाशित केले जाणारे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र, महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकाचे दालन जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत संमेलनस्थळी उभारण्यात आले आहे. या दालनामध्ये लोकराज्य मासिकाचे सन १९६४ पासूनचे दुर्मिळ, विशेष अंक ठेवण्यात आले असून वाचकांना हे अंक पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या दालनास भेट देण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
पर्यावरणप्रेमीची असाही शिरकाव…
तपोवन येथे कुंभमेळ्या निमित्त होणाऱ्या वृक्षतोडीला ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांनी विरोध केला. साहित्य वर्तुळात काय पाठिंबा आहे हे आजमावण्यासाठी संमेलनात आलेल्या लेखक, कवींच्या स्वाक्षरी मिळवत आंदोलनाची दिशा काय असेल त्याविषयी नियोजन केले.
