नाशिक – मतदार नोंदणी अधिकाऱ्याने मतदार नोंदणीला मंजुरी दिल्यानंतर १५ दिवसांत संबंधित मतदाराला मतदार ओळखपत्र मिळेल, असे नियोजन केले जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. मतदार यादीतील समान छायाचित्रे असलेले मतदार शोधण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सूचित केले.

​१६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरीय मतदार दिनाचा कार्यक्रम रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निष्पक्ष मतदान प्रक्रियेसाठी वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. त्यातूनच आचारसंहिता, छायाचित्र मतदार यादी, ईव्हीएम, निवडणूक निरीक्षक, मतमोजणी प्रक्रिया या संकल्पना पुढे आल्या. ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा पुरविण्यात येते. अपात्र मतदार यादीत राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचा दावा चोक्कलिंगम यांनी केला.

मतदार यादीतील समान छायाचित्रे असलेले मतदार शोधण्याचे काम सुरू आहे. मतदार यादी त्रुटीविरहित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या अडचणीची आपल्याला जाणीव आहे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही चोक्कलिंगम यांनी सांगितले.

​मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग या दोन्ही संस्था वेगवेगळ्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेनंतर मतदार नोंदणी आणि लोकप्रतिनिधीत्व कायदा अस्तित्वात आला. लोकशाही आणि विकास यांचा परस्पर संबंध आहे. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकशाही बळकट असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करावे, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले.

​विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भारतीय निवडणूक व्यवस्था अतिशय जवळून बघितल्याचे नमूद केले. या प्रक्रियेत मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहभाग घेतला आहे. आपली निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडली जाते. या प्रक्रियेतील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून ते निवडणूक निर्णय अधिकारी अतिशय शिस्तीत काम करतात. निवडणूक यंत्रणेचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांनी दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मतदारविषयक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शांतारामबापू वावरे महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले.