लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत सोमवारी पारा ४०.५ अंशावर गेला असतानाही मतदारांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. अनेक केंद्रांवर सकाळपासून लागलेल्या रांगांवर तापलेल्या वातावरणाचा कुठलाही परिणाम झाला नाही. सायंकाळपर्यंत हा उत्साह टिकून होता. शहर व ग्रामीण भागात अनेक केंद्रांवर मतदानासाठी एक ते दीड तास रांगेत थांबावे लागले. ज्येष्ठांना कमालीचा त्रास झाला. विलंबास मतदान केंद्रातील नियोजनाचा अभाव आणि संथपणे काम करणारी यंत्रणा जबाबदार असल्याची तक्रार अनेकांनी केली.

नाशिक, दिंडोरी मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. नाशिकमधील १९१० केंद्रांवर तर, दिंडोरीत १९२२ केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उन्हाचा तडाखा आणि वळिवाचे सावट यामुळे सकाळपासून मतदार उत्स्फुर्तपणे मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे कॉलेज रोड, गंगापूर रोड, पंचवटी, मखलमाबाद, जुने नाशिक, सातपूर, सिडको अशा सर्वच भागातील केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक केंद्रांवर मतदानासाठी एक ते दीड तास लागला. गर्दीमुळे विलंब लागत असल्याची अनेकांची भावना होती. परंतु, बराच वेळ उभे राहूनही रांग पुढे सरकत नव्हती. रांगेत ज्येष्ठ नागरिक त्रासले होते. त्यांना घेऊन आलेले कुटुंबातील सदस्य बाहेर तिष्ठत होते. आनंदवल्लीतील मनपा शाळेतील केंद्रात सुमारे १८ कक्ष होते. रांगांची सरमिसळ झाल्याने कोणत्या कक्षाची कोणती रांग याचा अंदाज येत नसल्याने गोंधळ उडाला. गंगापूर रस्त्यावरील वाघ गुरुजी शाळेत वेगळी स्थिती नव्हती. अनेक कक्षांसमोर लांबलचक रांगा होत्या. उन्हाच्या तडाख्याने कमालीचा उकाडा होता. मतदान प्रक्रिया संथपणे सुरू असल्याने दाटीवाटीने थांबलले मतदार घामाच्या धारांनी अक्षरश: न्हावून निघाले.

आणखी वाचा-मतदान केंद्रावर शिंदे गटाच्या सदस्याला जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेलेल्या दोन मुलांना पोलिसांनी थांबवल्याने गोंधळ

वाघ गुरुजी शाळेतील केंद्रात काही कक्षात साधारणत: १२५० मतदार होते. याआधीच्या निवडणुकीत एका कक्षात दोन मतदान यंत्र ठेवली गेली होती. यावेळी एका कक्षात (खोलीत) एकच यंत्र ठेवल्याने मतदारांना बराच वेळ तिष्ठत रहावे लागल्याचे निरीक्षण भाजपचे शहर उपाध्यक्ष देवदत्त जोशी यांनी नोंदविले. निवडणूक यंत्रणेने मतदान केंद्राचा अभ्यास केला नाही. जिथे जास्त मतदार होते, तिथे दोन यंत्रांची व्यवस्था करणे गरजेचे होते. ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना वेळ लागतो. त्याचा विचार करून नियोजनाची आवश्यकता त्यांनी मांडली. भ्रमणध्वनी बरोबर नेण्यास प्रतिबंध केल्याने काही मतदार माघारी निघून गेले. आमदार सिमा हिरे यांनी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वच केंद्रांवर गर्दी झाल्याचे सांगितले. एका व्यक्तीला मतदानास साधारणत: १० मिनिटे लागतात. यामुळे विलंब झाला. ज्येष्ठांना रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून अन्य मतदारांनी काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. मिनल भोसले यांनी मतदानाला गेलेल्या व्यक्तीला यंत्रापर्यंत पोहोचेपर्यंतची प्रक्रिया संथ होती. चिठ्ठी असूनही मतदानास वेळ लागला. काही मतदारांनी यंत्र संथपणे कार्यरत असल्याच्या तक्रारी केल्याचे सांगितले.

कुठल्याही निवडणुकीत एका कक्षात (खोलीत) दोन यंत्र उपलब्ध केलेले नाहीत. मतदार रांगेतून कक्षात आल्यानंतर यादीत त्याचे नाव शोधणे, ओळख पटवणे, शाई लावणे, चिठ्ठी देणे ही प्रक्रिया केली जाते. त्यास वेळ लागतो. त्यानंतर तो मतदान करतो. यास पाच मिनिटे गृहीत धरण्यात आली आहेत. अनेक केंद्रांवर गर्दीमुळे मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. -डॉ. शशिकांत मंगरुळे (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक)