नाशिक – वॉल्टर स्पिंक आणि अजिंठा हे जणू समीकरण ठरावे, एवढे सखोल संशोधन या अमेरिकन इतिहास तज्ज्ञाने करून ठेवले आहे. सुमारे सहा दशके अजिंठ्याशी जोडले गेल्यानंतर त्यांनी सात जाडजुड खंडातून समग्र अजिंठ्यांचा इतिहास मांडला. स्पिंक यांच्या नजरेतला अजिंठा पाहणे, ऐकणे समजून घेणे हा रोमांचक अनुभव यंदाच्या २९ व्या भटकंती कट्ट्यावर मिळणार आहे.

यंदाचा २९ वा भटकंती कट्टा फ्रावशी टाऊन येथे २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत होणार आहे. कल्याण येथील इतिहासाच्या अभ्यासक शुभा खांडेकर या वॉल्टर स्पिंक यांच्या नजरेतला अजिंठा उलगडून दाखवणार आहेत. अजिंठा म्हटले की सर्वात प्रथम अंधार गुहेतली अनन्यसाधारण चित्रकलाकृती आठवतात. परंतु, चित्रकलाकृती पलिकडचा अजिंठा हा विशाल विषय आहे. स्पिंक यांनी आपल्या संशोधनातून तो मांडला. स्पिंक यांच्या संशोधनातून पुढे आलेला जो अजिंठा आहे तो शुभदा खांडेकर या व्याख्यानातून उलगडणार आहेत.

काळ्याकुट्ट अंधारात अचानक लखलखीत वीज चमकून क्षणभरासाठी संपूर्ण सृष्टी उजळून निघावी, तसा अजिंठा हा एका अत्यल्पजीवी परंतु दैदीप्यमान इतिहासाचा, जीवापाड जपून ठेवावा, असा विलक्षण तेजस्वी तुकडा आहे. आणि या तुकड्याचे सर्व बारकाव्यांसह डाॅ. वाॅल्टर स्पिंक यांनी आपल्याला दर्शन घडवले आहे.

अजिंठ्याला भित्तिचित्राांशिवाय स्थापत्य आणि शिल्पकलेचाही मोठा खजिना आहे. बहुतेक लेणी अपूर्णावस्थेत का आहेत, मोजक्याच लेण्यांमध्ये रंगीत चित्रे का, शेकडो ठिकाणी एकावर एक चढवलेल्या बुद्धमूर्ती का, या सर्व उपक्रमामागची मूळ प्रेरणा काय, अशा अनेक प्रश्नांची स्पष्टीकरणे कोणाही इतिहासतज्ज्ञाला देता येत नव्हती. अशा परिस्थितीत प्रा. डॉ. वॉल्टर स्पिंक हे कला इतिहासाशी संबंधित संशोधनासाठी विषय शोधत १९५२ मध्ये अजिंठ्याला येऊन ठेपले. आणि त्यांनी अजिंठा हीच त्यांची कर्मभूमी निवडून संशोधनाला सुरुवात केली.

स्पिंक हे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात भारतीय कलाइतिहास शिकवत असत. त्यांचे निधन २३ नोव्हेंबर २०१९ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी झाले. तोपर्यंत ते कार्यरत होते. वर्षातून दोन वेळा अजिंठ्याला येत. तो क्रम त्यांनी एकदाही चुकवला नाही. स्पिंक यांनी ६६ वर्षे अजिंठा संशोधनास वाहून घेतले. त्यांनी आपले संशोधन सात जाडजूड ग्रंथांमध्ये लिहून ठेवले. त्यामुळे अजिंठ्याबद्दलच्या पारंपरिक समजुती मुळापासून उखडल्या गेल्या. स्पिंक यांची मांडणी ‘सुधारित लघु कालक्रम’ या नावाने जगप्रसिद्ध झाली.

स्पिंक यांनी भारतात संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी बदामी, घारापुरी (एलिफंटा) व अजिंठा असा वेध घेतला. स्पिंक यांनी अजिंठ्याचा इंचन इंच पिंजून काढला. स्पिंक यांची असामान्य निरीक्षणशक्ती, तपशिलाचा अन्वयार्थ लावण्याची हातोटी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुराव्यांची सांगड एकमेकांशी घालण्याची समावेशक दृष्टी यांमुळे अजिंठ्याची रहस्ये स्पिंक यांच्यामुळे उलगडली.

या ज्येष्ठ संशोधकाच्या नजरेतून महाराष्ट्राच्या मातीत उमललेली आणि जगाला मंत्रमुग्ध करणारी अजिंठा लेणींची गाथा ऐकणे एक रम्य अनूभूती ठरणार आहे. यानिमित्ताने भटकंती कट्टा नाशिकची वाटचाल एका अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा सुरू होणार आहे. यंदापासून दीर्घ काळापर्यंत फ्रावशी टाऊनशी या कट्ट्याचे नाते जोडले जाणार आहे. या पुढील सर्व कट्टे आता या नव्या स्थळावर होणार असल्याची माहिती भटकंती कट्ट्याच्या वतीने देण्यात आली आहे.