काम अंतिम टप्प्यात, ३० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असल्यामुळे शेतकरी, बागायतदार आनंदित

पालघर : सूर्या पाटबंधारे प्रकल्पातील पाणी डहाणू तालुक्यातील पश्चिमेच्या भागातील शेतकऱ्यांना मिळण्याची गेल्या २५-३० वर्षांची मागणी येत्या डिसेंबर महिन्यात पूर्ण होण्याच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांमध्ये आनंद असून त्यांना दिलासा मिळाला आहे.

१९९०-९५ सालापासून सूर्या पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पालघर व डहाणू तालुक्यातील पश्चिमेच्या भागाला मिळण्याची मागणी पुढे आली होती. या मागणीला १९९८ साली तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी तत्त्वत: मान्यता दिली होती. पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी पश्चिमेकडे नेण्यास अडथळा असणाऱ्या रेल्वे रुळाखालून जलवाहिनी टाकण्याच्या सुमारे ६५ लाख रुपये खर्च असलेल्या कामाचे भूमिपूजन सन २००६ मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींचे कारण सांगून हे काम प्रलंबित राहिले होते. परिणामी, या सिंचन प्रकल्पातील पाण्यापासून डहाणू तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी वंचित राहिले आहेत.

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील डहाणू तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता पालघर जिल्हा भाजीपाला, फळे-फुले उत्पादक संघाच्या वतीने या समस्येबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी अधिकारीवर्गाकडे मंत्र्यांनी  विचारणा केली असता रेल्वे रुळाच्या खालून जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वाला आल्याची त्यांनी माहिती दिली. पावसाळ्यामुळे पुढील कालव्याचे काम थांबले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पातील उर्वरित काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी जलसंपदामंत्र्यांना दिले होते. त्यानुसार ही माहिती मंत्र्यांनी डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांना दिली. सूर्या प्रकल्पातील पाणी डहाणू तालुक्यामधील पश्चिमेच्या भागाला मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

७०० हेक्टर बागायतीला लाभ

सूर्या प्रकल्पातील पाणी वाणगाव येथून रेल्वे रुळाखालून पश्चिमेला मोगरबाव येथील तलावात सोडण्यात येणार आहे. या तलावालगतच्या नैसर्गिक नाले-ओहळामार्गे हे पाणी पश्चिमेच्या विविध भागांत पोहोचणार असून यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाणगाव पश्चिमेच्या भागांत मोठ्या प्रमाणात शेती- बागायती पद्धतीने केली जात असून मार्च महिन्याच्या अखेरीस अनेक कूपनलिकेचे पाणी मचूळ व निमखारे होत असल्याचे तसेच पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. सूर्या प्रकल्पातील पाणी पश्चिमेला आल्यास जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासोबत किमान ७०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला बागायती क्षेत्रामध्ये वाढ होईल, अशी आशा आहे.