नाशिक – साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री सप्तश्रृंग गडावर चैत्रोत्सवानिमित्त दररोज लाखोंहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असताना गडाच्या पायथ्याशी तसेच परिसरात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी निवासी आणि बाहेरगावहून आलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांची तहान टँकरद्वारे भागवली जात असून टँकरसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

सप्तश्रृंग गड समुद्रसपाटीपासून चार हजार ६५९ फुट उंचीवर आहे. गडावर पायी जाणाऱ्यांसाठी ४७२ पायऱ्या आहेत. सध्या गडावर चैत्रातील उत्सव सुरू आहे. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कावडधारी तसेच अन्य भाविक येत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातून पायी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. उत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता प्रशासनाच्या वतीने पिण्यासाठी पाणी, वैद्यकी, अशा सुविधा दिल्या जात असल्याचा दावा केला जात असतांना गडाच्या पायथ्याशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र बिकट झाला आहे. देवस्थानच्या वतीने गडाच्या पायथ्याशी, पायऱ्या चढतांना, शिवालय तलावाजवळ तसेच गडावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली असल्याचे देवस्थानचे विश्वस्त ॲड. ललित निकम यांनी सांगितले. परंतु, उन्हाचा वाढता तडाखा पाहता पिण्यासाठी तसेच अन्य वापराकरीता पाणी मिळवितांना अडचणी येत आहेत.

गडावरील चैत्र उत्सवासाठी दररोज लाखो भाविकांची गर्दी जमत आहे. काही जण धार्मिक विधीसाठी पुरोहितांकडे, हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबत आहेत. अशी तरंगती गर्दी या ठिकाणी थांबल्याने पाणी मिळवतांना, साठवतांना स्थानिकांची दमछाक होत आहे. ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणी पुरवठा केल्यानंतरही ते पाणी कमी पडत असल्याने ग्रामस्थ तसेच व्यावसायिकांची भिस्त खासगी टँकरवर असते. खासगी टँकरसाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

दुसरीकडे, बाहेरून येणाऱ्या भाविकांना इतरवेळी १० रुपयांना मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी १२ ते २० रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाची तीव्रता पाहता भाविकांकडून पाच ते १० लिटरचे जार विकत घेतले जात आहेत. परंतु, दिवसभरात तेही पाणी पुरत नसल्याने वणवण करण्याची वेळ आली आहे. याविषयी स्थानिकांनी व्यथा मांडली. आम्ही पाणी मिळेल त्या भांड्यात साठवून ठेवतो. त्यामुळे घरात इतर वस्तूंपेक्षा पाणी भरलेल्या भांड्यांचा अधिक पसारा आहे. सध्या यात्रा असल्याने कोणी पाणी मागितल्यास त्यांना देण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.