बुधवारी आता नियमित पाणीपुरवठा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे तूर्तास पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तथापि, सर्व धरणांमध्ये मुबलक जलसाठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे पुढील काळात गरज भासल्यास पुन्हा पाणीकपात करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. साप्ताहिक पाणीकपात मागे घेतल्यामुळे बुधवारी शहरवासीयांना नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे.

प्रारंभीच्या दीड महिन्यात काही तालुक्यांचा अपवाद वगळता बहुतांश भागाकडे पावसाने पाठ फिरवली होती. धरणांची पातळी कमी झाल्याने महापालिकेला ऐन पावसाळ्यात कपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानुसार संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवला गेला. दोन आठवडे कपात करावी लागली. याच कालावधीत त्र्यंबकेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळला. त्याचा लाभ गंगापूर आणि समूहातील धरणातील जलसाठा उंचावण्यात झाला.  गंगापूर निम्मे भरले तेव्हाच टंचाईचे संकट दूर होईल, अशी अटकळ बांधली गेली. कपातीचा निर्णय मागे घेतला जाईल, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली. मात्र, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गंगापूरमधील जलसाठा उंचावला असला तरी समूहातील स्थिती समाधानकारक नसल्यामुळे लगेच कपात मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पुढील काही दिवसांत गंगापूर समूहातील अन्य धरणांचा जलसाठा काहीसा उंचावला. पालकमंत्र्यांनी जलसाठ्याचा आढावा घेऊन प्रशासनास कपातीबाबत निर्णय घेण्याचे सूचित केले होते.

सोमवारी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत जलसाठ्याचा आढावा घेण्यात आला. गंगापूर धरणात सध्या ४२८९ दशलक्ष घनफूट (७६.१८ टक्के), कश्यपी ९०७ (४८.९७), गौतमी गोदावरी १०९१ (५८.४०) आणि आळंदी धरणात ६२१ (६८.१२) जलसाठा आहे. मुकणेमधून काही भागात पाणीपुरवठा होता. या धरणात ३७३६ दशलक्ष घनफूट म्हणजे ५१.४७ टक्के जलसाठा आहे. मुकणेत तुलनेत कमी पाणी आहे.

कुठलेही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाऊस पुन्हा गायब झाल्यास आणि धरणे भरली नाही तर त्या त्या वेळचा जलसाठ्याचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटले आहे. तूर्तास कपात रद्द झाल्यामुळे बुधवारी शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.