scorecardresearch

जलसंपदाच्या संशोधन संस्था अंधारात

साडेतीन लाखांचे देयक थकल्याने मेरीचा वीजपुरवठा खंडित; भूकंपमापनासह राज्यातील धरणांशी संबंधित कामकाज ठप्प

जलसंपदाच्या संशोधन संस्था अंधारात

नाशिक : राज्यातील धरणांची देखभाल-दुरुस्ती, नव्या धरणांचे संकल्पन, गाळ सर्वेक्षण, भूकंपमापन आदी महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी) मुख्यालय वीज देयक न भरल्याने पाच दिवस अंधारात राहिले. परिणामी, सर्वच विभागांचे कामकाज ठप्प झाले.

भूकंपाचे धक्के बसले तरी त्याचे मापन करणे अवघड झाले. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत ही संशोधन संस्था आहे. जलसंपदा हे प्रभावशाली आणि सधन खाते मानले जाते. त्याच्या अखत्यारीतील संशोधन संस्थेवर साडेतीन लाखांचे वीज देयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढावली. अधिवेशन काळात गदारोळ होऊ नये म्हणून मेरीतील अधिकाऱ्यांनी धावपळ करीत महावितरणला धनादेश देऊन मंगळवारी सायंकाळी वीजपुरवठा पूर्ववत केल्याचे सांगितले जाते.

राज्यात धरणांचे संकल्पन, बांधकामासह अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाच्या उद्देशाने १९५९ मध्ये स्थापन झालेल्या मेरी संस्थेला मागील काही वर्षांपासून घरघर लागल्याचे दिसत आहे. आता वीज देयक वा तत्सम बाबींसाठी शासनाकडून वेळेवर पैसे दिले जात नसल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. दिंडोरी रस्त्यावर सुमारे १५० एकर जागेत ही संस्था पसरलेली आहे. ती मेरी मुख्यालय, संलग्न मध्यवर्ती संकल्पनाचित्र संघटना (सीडीओ), जलविज्ञान केंद्र, धरण सुरक्षितता अशा वेगवेगळय़ा विभागांत विभागलेली आहे.

यातील दिंडोरी रस्त्यावरील मेरी मुख्यालयावर सलग पाच दिवस अंधारात राहण्याची वेळ आली. मेरी मुख्यालय इमारतीचे चार महिन्यांचे साडेपाच लाख रुपयांचे देयक थकीत होते. वारंवार तगादा लावल्यानंतर काही रक्कम भरली गेली. उर्वरित थकीत साडेतीन लाख रुपये भरले जात नव्हते. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महावितरणने गेल्या शुक्रवारी मेरी मुख्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे पाऊल उचलले.
वीजपुरवठा खंडित झाल्याने कामकाज तर ठप्प झालेच. शिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अंधारात बसण्याची वेळ आली. ज्या इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाला, तिथे भूकंप आघात सामग्री आणि पृथक्करण कक्ष, गाळ सर्वेक्षण व सुदूर सर्वेक्षण, सामग्री चाचणी, संरचनात्मक संशोधन, महामार्ग संशोधन आदी विभाग आहेत. महत्त्वाचे म्हणजे याच ठिकाणी मेरीचे महासंचालक, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, विविध विभागांचे संशोधन अधिकारी आदींची कार्यालये आहेत. वीज नसल्याने संबंधितांना कार्यालयातून कामकाज करणे अवघड झाले.

भूकंपमापन अधांतरी ?
आठवडाभरात दिंडोरी परिसरात अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. पहिले धक्के १६ ऑगस्ट रोजी बसले. तेव्हा मुख्यालयात वीजपुरवठा होता. गेल्या रविवारी पुन्हा भूकंपाचे दोन धक्के बसले. त्यावेळी वीजपुरवठा खंडित असला तरी इनव्र्हटरच्या आधारे मापन यंत्रणा कार्यान्वित राहिल्याने धक्क्यांची नोंद होऊ शकली. नंतर मात्र या यंत्रणेने मान टाकल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जिल्ह्यासह आसपासच्या भागात भूगर्भात काही घडामोडी घडल्या तरी त्याची नोंद होण्याची व्यवस्थाच कार्यान्वित नव्हती.

अखेर दिवे पेटले..
शुक्रवार ते मंगळवार या काळात रविवारची साप्ताहिक सुट्टी होती. उर्वरित चार दिवसांत विजेअभावी कुठलीही कामे पुढे सरकली नाहीत. अधिवेशन काळात हा विषय त्रासदायक ठरेल, हे लक्षात घेत मेरीच्या संबंधित विभागाकडून वीज देयकाचा भरणा करण्यासाठी धावपळ सुरू होती. पैशांची तजवीज करत मंगळवारी साडेतीन लाखांचा धनादेश वीज कंपनीला देण्यात आला. त्यामुळे कार्यालय बंद होण्याच्या आधी साडेचार वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अखेरची घरघर..
कधीकाळी देशासह परदेशातील नामवंत संशोधन संस्था म्हणून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) जलसंपदा विभागाच्या कारभारामुळे अनेक अडचणींना तोंड देत आहे. अनेक वर्षांपासून संस्थेत संशोधनाची फारशी कामे झाली नाहीत. त्यामुळे काही संशोधन विभाग बंद केले गेले वा अन्य विभागात समाविष्ट करावे लागले. परदेशातून संशोधनाची मिळणारी कामेही निष्क्रियतेमुळे बंद झाली असून संस्थेची केवळ ‘चाचणी घेणारी प्रयोगशाळा’ अशी ओळख शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. धरणाशी संबंधित अथपासून इतिपर्यंतची कामे येथे होतात. द्रुतगती संशोधन विभागात पूर्वी बाहेरील देशातून प्रतिकृती तपासणीची कामे यायची. आता तिथे राज्यातील धरणांची कामे येत नसल्याचे पूर्वी काम करणारे अधिकारी सांगतात. कधीकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मेरीला ‘डॉक्टरेट’ संशोधनासाठी मान्यताप्राप्त संस्थेचा दर्जा दिला होता, परंतु त्यासाठीची रक्कम भरली न गेल्याने ही मान्यताही नंतर रद्द झाल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water resources research institutes in the dark amy