दिंडोरी तालुक्यातील वाघाड कालव्याला पिण्यासाठी सोडलेले पाणी पोटचाऱ्यांना गावतळ्यात न सोडताच अवघ्या चार दिवसांत बंद करण्यात आल्यामुळे पाणीटंचाईची स्थिती ‘जैसे थे’ राहिली आहे. वाघाड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील सर्व कालव्यांचे १५ दिवस वा महिनाभर पाणी सोडत विविध नदी, नाले, पोटचाऱ्यांना पाणी दिले जात असताना वाघाड लाभक्षेत्रावर अन्याय का, असा सवाल ग्रामस्थांनी केला.
वाघाड लाभक्षेत्रातील हातनोरे, निगडोळ, पाडे, निळवंडी, कादवा म्हाळुंगी, उमराळे, दिंडोरी, वनारवाडी, तळेगाव, आक्राळे, खतवड, आंबे दिंडोरी ढकांबे आदी गावांमध्ये भूजल पातळी कमालीची खाली गेली असून विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या भयावह झाली आहे. हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागाही संकटात सापडल्या आहेत. वाघाड धरणातील सिंचनासाठी असणारे पाणी नंतर केवळ पिण्यासाठी राखीव करण्यात आले. येथील पाणी वाटप महासंघाचे नियोजन आदर्शवत असताना प्रशासनाने पाणी वाटप संघ व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याने जनता विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू झाला होता. हक्काचे राखीव पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांची भेट घेऊन व्यथा मांडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले. परंतु, केवळ चार दिवसांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. वाघाड धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव केले हे वास्तव शेतकऱ्यांनी स्वीकारले. परंतु हे पाणी या लाभक्षेत्रासाठी गावांनाच पिण्यासाठी पुरवावे. या लाभक्षेत्रातील सर्व गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असून त्याचा वापर इथेच व्हावा असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने हे पाणी पालखेड धरणात सोडून इतरत्र नेण्याचा प्रयत्न केल्यास जनक्षोभास सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.