लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत बुधवारपासून जिल्ह्यात जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्याच्या विशेष मोहिमेस सुरुवात झाली. जिल्ह्यात १५ जूनपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथील जलकुंभ, टाक्यांची स्वच्छता तसेच हातपंप शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

बुधवारी पेठ आणि निफाड तालुक्यापासून अभियानाला सुरुवात झाली. ग्रामपंचायतीने गावाला पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याची आवश्यकता असते. यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जलकुंभ, टाक्या धुण्यासह हातपंप शुद्धीकरण, टीसीएल पावडर साठवणूक व नमुना तपासणी, साथीचे आजार इत्यादी विषय अत्यंत महत्वाचे आहेत. दरवर्षी जून महिन्यात जिल्ह्यात जलकुंभ स्वच्छता अभियान राबविण्यात येते. प्रत्येक तालुक्याला वेळापत्रक तयार करून देण्यात आले आहे. ग्रामपंचायत, अंगणवाडी आणि शाळेत वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून त्या स्वच्छ करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-धुळे: अक्कलपाडातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता; ३६ गावांना दिलासा

गावातील पाणी पुरवठा योजनेच्या वाहिनीची तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करून सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात येणार आहे. पूरग्रस्त गावांमधील वापरात असलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे पुराच्या पाण्यामुळे बाधित होतात. अशा वेळेस गावातील इतर स्रोतांचा वापर करण्यासाठी पूर्व नियोजन म्हणून त्याची स्वच्छता व तपासणी करून पाणी पुरवठा करणेस उपयोगात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा तसेच तालुकास्तरावरुन दैनंदिन स्वरुपात अभियानाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे.

अभियानासाठी सर्व संबंधित विभागांना व ग्रामस्तरावरील कर्मचारी यांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली. ग्रामपंचायतींनी सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करून, त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख रंगाने नमूद करावी, पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात टीसीएल पावडर उपलब्ध राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी केले आहे.

आणखी वाचा-नाशिक : स्वच्छता मोहिमेचे यशापयश पावसाच्या हाती, सराफ बाजारात दीड टन कचरा संकलित

जिल्ह्यात ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी मिळून पाच हजाराहून अधिक जलकुंभ आहेत. त्यांची गुणवत्ता तपासण्याचे काम जिल्हा परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. काही महिन्यापूर्वी इगतपुरी, दिंडोरी परिसरात दुषित पाण्यामुळे नागरिकांना त्रास झाला होता. सध्यस्थितीत पेठ, हरसूल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर परिसरात टंचाई जाणवत आहे. विहीरींनी तळ गाठल्याने दुषित पाणी नागरिकांपर्यंत जात आहे. अशा स्थितीत पावसाळा सुरू होण्याआधी ही मोहीम पूर्ण झाल्यास आरोग्य अबाधित राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हयात सर्व जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण अभियान राबविण्यात येत आहे. -आशिमा मित्तल ( मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water tank cleaning hand pump cleaning campaign in nashik district mrj
First published on: 08-06-2023 at 14:18 IST