दोन महिन्यांचे थकलेले वेतन मिळावे, या मागणीसाठी येथे मंगळवारी मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. मात्र, महापौर जयश्री महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत, थकीत वेतन दोन दिवसांत देण्याचे आश्वासित केले. मात्र, घंटागाडी चालकांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आंदोलन मागे न घेतल्यास घंटागाड्यांच्या चाव्या जमा करा, असा इशारा दिल्यानंतर कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा >>>नाशिक : शिंदे गटाकडून ठाकरे गटाला सुरुंग लावण्याची धडपड
महापालिका प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीची दोन महिन्यांची देयके थांबविली आहे. त्यामुळे कंपनीतर्फे घंटागाडी चालकांचे वेतन रखडले आहे. कंपनीने काम थांबविण्याचा इशारा स्मरणपत्राद्वारे दिला होता. मात्र, त्यापूर्वीच मंगळवारी घंटागाडी चालकांनी थकीत वेतन मिळण्यासाठी मंगळवारी सकाळी कामबंद आंदोलन सुरू केले. महापौर जयश्री महाजन यांनी टी. बी. रुग्णालय परिसरात जात आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आयुक्त देविदास पवार, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील उपस्थित होते. महापालिकेकडून देयके अदा झाल्यानंतर दोन दिवसांतच थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल, असे महापौर महाजन यांनी आश्वासित केले. मात्र, आंदोलकही आपल्या भूमिकेवर ठाम होते. महापालिकेच्या १९ पैकी १० प्रभागांत कायम कर्मचार्यांकडून, तर नऊ प्रभागांत मक्तेदाराच्या कामगारांकडून साफसफाई केली जाते. मंगळवारी सकाळी काम ठप्प झाल्याने महापौरांनी सर्व घंटागाड्या चालकांकडील चाव्या ताब्यात घेण्याचे आणि महापालिकेच्या कायम कामगारांना कचरा संकलनाचे आदेश दिले होते. त्यानंतर घंटागाडी चालकांनी आंदोलन मागे घेतले.