रुग्णसंख्येत घट, एच.आय.व्ही. बाधित रुग्णांचा दर जिल्ह्यात ०.२ टक्के

नाशिक :  सातत्याने होणारे प्रबोधन, औषधोपचार यामुळे एड्स आता नियंत्रणात येत आहे. जिल्ह्य़ातील एच.आय.व्ही. बाधित रुग्णांचा दर ०.२ टक्क्य़ांवर वर आला असून नाशिक जिल्ह्य़ाची एड्स मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे, अशी माहिती एड्स नियंत्रण अधिकारी योगेश परदेशी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हा आजार स्पर्शातून पसरतो, ही एक प्रकारची महामारी आहे, यासह इतरही अनेक गैरसमज काही वर्षांपूर्वी लोकांच्या मनात होते. या गैरसमजांमुळे एड्स आजार झालेल्या रुग्णांना वाईट वागणूक मिळत असे. त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही वेगळा असायचा. नातेवाईकांकडूनही त्यांना जणूकाही वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जात असे. या रुग्णांना समाजात चांगली वागणूक मिळावी, यासाठी आरोग्य विभागासह काही सामाजिक संस्थांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचे परदेशी म्हणाले.

आरोग्य विभागाने जिल्हा एड्स नियंत्रण पथकाच्या माध्यमातून शहर तसेच जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिला, स्थलांतरीत कामगार, वाहनचालक, महाविद्यालय स्तरावर या आजाराविषयी जनजागृती करण्यास सुरूवात केली. किशोरवयीन वयात आजाराविषयी माहिती व्हावी यासाठी ‘रेड रिबन क्लब’ची स्थापना करण्यात आली.

व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र, भित्तीपत्र, प्रदर्शन अशा वेगवेगळय़ा माध्यमातून आजाराची माहिती दिली गेली. याशिवाय ‘एचआयव्ही’एड्सग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ए.आर.टी. केंद्र सुरू झाले. नाशिकनंतर मालेगाव सामान्य रुग्णालयातही उपचार केंद्र सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी, वाहतुकीच्या अडचणी पाहता जिल्ह्यात कळवण, निफाड, येवला, सटाणा, मनमाड येथेही उपकेंद्र सुरू करण्यात आले. ‘एचआयव्ही’ग्रस्त मातांकडून नवजात शिशूला होणारा संसर्ग पाहता तपासणीच्या माध्यमातून अशा बालकांचा शोध घेत त्यांच्यावरही तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले.

दरम्यान, करोना काळात या रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. संबंधित रुग्णांना औषधोपचारासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून काही सामाजिक संस्था, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत औषधे पोहोचविण्यात आली. या सर्व एकत्रित प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असल्याचेही परदेशी म्हणाले.