नाशिक : जगासह देशातील अनेक राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यांत भारनियमन होत असून प्रचंड तापमानाने विजेची मागणी वाढली आहे. राज्याच्या ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्रितपणे केलेले कार्य आणि योग्य नियोजनामुळे महाराष्ट्रात २२ दिवसांपासून भारनियमन झालेले नाही, असा दावा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात नवीन डहाळेवाडी उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा डॉ. राऊत यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. दुर्गम भागात चार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या विद्युत उपकेंद्रामुळे परिसरातील ग्राहकांना अखंडित आणि योग्य दाबाचा वीज पुरवठा होणार आहे. या उपकेंद्रामुळे वावीहर्ष, टाकेहर्ष, डहाळेवाडी, चंद्राचे मेट, कळमुस्ते, अस्वलीहर्ष, दाडोशी, उमेशीमेट, बर्डेचीवाडी या आठ गावांतील ग्राहकांना अखंडित वीज पुरवठयाचा लाभ होईल.
महावितरण ही वीजवितरणासोबत रात्र अन दिवस सेवा देणारी कंपनी आहे. करोना काळात, अतिवृष्टी आणि महापुरातही राज्यामध्ये अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली. वीज पुरवठा करणे हे कार्य महावितरणचे असल्याने ग्राहकांनीसुद्धा आपली वीज देयके वेळेत भरून कंपनीला वीज कापण्याची संधी देऊ नये. अनेक गावामध्ये पथदिव्यांवरील दिवे दिवसाही सुरु असल्यामुळे विजेचा गैरवापर होतो. अनावश्यक देयक वाढते. त्यामुळे विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन राऊत यांनी केले. राऊत यांच्या हस्ते विद्युत उपकेंद्रातील परिसरातील नामफलकाचे अनावरण, वीज रोहित्राचे पूजन आणि आवारात वृक्षरोपण करण्यात आले. या उपकेंद्रामुळे वावीहर्ष, टाकेहर्ष, डहाळेवाडी, चंद्राचे मेट कळमुस्ते, अस्वलीहर्ष, दाडोशी, उमेशीमेट, बर्डेचीवाडी या आठ गावांतील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठयाचा लाभ होईल. कार्यक्रमास पाहुणे म्हणून आमदार हिरामण खोसकर, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
वीज देयकास दुय्यम स्थान
तापमानात वाढ होत असताना विजेच्या मागणीनेही उच्चांक गाठला आहे. वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा आणि बाजारातून रोखीने वीज विकत घ्यावी लागते. तसेच कोळसा वाहतूक, प्रशासकीय कामकाज आणि पगाराला दरमहा पैसे लागतात. मात्र अनेक ग्राहक इतर सेवांचे आधी पैसे मोजतात. पण वीज देयक भरताना दुय्यम स्थान देतात, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.