जळगाव : वाढत्या प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना ते हसनपूर रोड दरम्यान विशेष अनारक्षित साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार व भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सणासुदीचा हंगाम, लग्नसराईचा कालावधी तसेच परराज्यात कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागाचे जनसंपर्क अधिकारी अनुभव सक्सेना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, गाडी क्रमांक ०९०३१ उधना–हसनपूर रोड अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी दर रविवारी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता ही गाडी हसनपूर रोड येथे पोहोचेल. ही सेवा १५ फेब्रुवारीपासून २९ मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे, ०९०३२ हसनपूर रोड–उधना विशेष गाडी दर सोमवारी रात्री ०९:४५ वाजता हसनपूर रोड येथून सुटेल आणि बुधवारी दुपारी ०३:०० वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी १६ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान धावणार आहे.
उधना–हसनपूर रोड दरम्यान धावणारी विशेष गाडी दोन्ही बाजुने चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र जंक्शन, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट आणि सुलभ जोडणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि भुसावळ येथे थांबा मिळाल्याने स्थानिक प्रवासी, कामगार, विद्यार्थी तसेच व्यावसायिक वर्गाला मोठा फायदा होणार आहे.
दोन्ही विशेष गाड्यांना संपूर्णपणे सामान्य द्वितीय श्रेणीचे (अनारक्षित) डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. नियमित गाड्यांमध्ये आरक्षण न मिळाल्याने प्रवाशांना होणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः स्थलांतरित कामगार, लहान व्यापारी, कुटुंबासह प्रवास करणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही गाडी सोयीची ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार असून, गाडीच्या वेळापत्रकाबाबत व थांब्यांबाबत अधिकृत माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर तसेच स्थानकांवरील सूचना फलकांवर उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची खातरजमा करूनच नियोजन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
