नाशिक – केंद्र किंवा राज्य सरकारी नोकरी मिळावी, असे कित्येकांचे स्वप्न असते. अर्थात, प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. सरकारी नोकरी मिळणे एकतर दिवसेंदिवस दुरापास्त होत आहे. सरकारी नोकरीच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात. पश्चिम रेल्वेने अशीच एक संधी बेरोजगार युवकांसाठी आणली आहे. पश्चिम रेल्वेत ५, ३४९ ॲप्रेटिस जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी ही मोठी संधी आहे.
कोणत्याही सरकारी किंवा खासगी नोकरीत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा असे टप्पे पार करावे लागतात. परंतु, पश्चिम रेल्वेच्या या भरतीत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा तोंडी परीक्षा द्यावी लागणार नाही. केवळ, दहावी आणि आयटीआयमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी टक्केवारी काढली जाणार आहे. आपल्या गुणवत्तेवर भरवसा असलेल्यांसाठी ही चांगली संधी आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण झालेले असावे. तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आयटीआयच्या फिटर, वेल्डर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वायरमन, प्लंबर, मशिनिस्ट यांसह इतर अनेक ट्रेडसाठी पश्चिम रेल्वेत पदे उपलब्ध आहेत. निवड प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक पध्दतीची राहील, असे पश्चिम रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मार्च आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधीच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पश्चिम रेल्वेच्या या भरतीत महिला तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एससी, एसटी) प्रवर्गासाठी अर्जाचे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. त्यांच्यासाठी अर्ज करणे पूर्णपणे मोफत आहे. परंतु, इतर प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील उमेदवारांना प्रामुख्याने मुंबई विभागासह पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमध्ये प्रशिक्षण आणि नियुक्ती मिळू शकेल. मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, भावनगर, रतलाम या विभागासाठी ही भरती होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे कार्यशाळा आणि संबंधित युनिटमध्ये काम करण्याची संधी मिळेल. अर्ज करताना दहावीचे मार्कशीट, आयटीआय प्रमाणपत्र, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गांसाठी), रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अशी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील.
यासंदर्भात अधिक माहिती उमेदवारांना https://www.rrc-wr.com या संकेतस्थळावर मिळू शकेल. रेल्वेसारख्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणे तसे कठीणच. आणि तेही कोणत्याही मुलाखती आणि लेखी परीक्षेविना. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही मोठी संधी असल्याने त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

