लोकसत्ता वार्ताहर धुळे : जिल्हा पोलिसांनी नाकांबदी आणि तपासणी मोहीम राबवून एकाच रात्रीत गुन्हेगारांकडून सहा बंदुका, चार तलवारी, चॉपर आणि गुंगीकारक औषधे असा मुद्देमाल जप्त केला. गुन्हेगारांविरुध्द जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वेगवेगळ्या स्तरावर कार्यवाही सुरु केली आहे. धुळे शहरात अनेक तरुण बंदी असलेल्या औषधांचे सेवन करून शरीरसौष्ठवपटू बनत असल्याने पहिल्यांदाच जिम आणि काही व्यायाम शाळांचीही अचानक तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रात्री कारवाई करण्यात आली. दहशत माजवण्याच्या उद्देशाने अनधिकृतपणे गावठी बंदूक स्वतःकडे बाळगणार्या पाच जणांना पकडण्यात आले. आणखी वाचा-धुळे कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावे लाच सुरज मार्कंड (२६, रा.भाईजीनगर, चितोड रोड, धुळे), काशिफ शेख (२१, रा.इब्राहिम मशिदमागे, ऐंशी फुटी रोड, धुळे), धर्मा मोरे (रा.आरती कॉलनी, देवपूर, धुळे), रवी सोनी (२८, रा.देवझरी कॉलनी, सेंधवा, मध्य प्रदेश) यांच्याकडून प्रत्येकी एक बंदूक आणि जिवंत काडतुसे तर सुनील उर्फ सनी अहिरे (२४, रा.नाणे, ता.धुळे) याच्याकडून दोन बंदुका, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. रोहित गवळी (रा.लक्ष्मीनगर, गवळीवाडा, धुळे) याच्याकडून एक तलवार, शाहिद शाह ( रा.अशोक नगर, दोंडाईचा) याच्याकडून कोयता, अजय सोनवणे (रा.मोहाडी उपनगर, धुळे) याच्याकडून तलवार आणि चॉपर, नाजिम बाली (रा.चाळीसगांव रोड, धुळे) याच्याकडून तलवार आणि गणेश गवळी (रा.आदर्श कॉलनी, देवपूर, धुळे) याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. मोहम्मद अन्सारी (रा.वडजाई रोड, मिल्लत नगर, धुळे) याच्याकडून चार हजार ५०० रुपयांची बेकायदेशीरपणे स्वतःजवळ ठेवलेली गुंगीकारक औषधे जप्त करण्यात आली. शरीरयष्टी लवकरात लवकर बलवान बनविण्यासाठी अनेक युवक बंदी असलेली औषधे घेत असल्याच्या संशयावरून खात्री करण्यासाठी पोलिसांनी पहिल्यांदाच शहरातील काही जिम आणि व्यायामशाळांची तपासणी केली. या अनुषंगाने संबंधित संचालकांना समजही देण्यात आली. आणखी वाचा-Nashik Crime : नाशिकमध्ये दुचाकीवर बसलेल्या तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद आजवर फरार असलेल्या गुन्हेगारांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. राजेंद्र गायकवाड (रा. वाघाडे शिवार, खडीवस्ती ता.बागलाण, जि.नाशिक), अमोल चव्हाण (रा.प्रशांत नगर, कलवाडी,मालेगांव, नाशिक) आणि साहेबराव ठाकरे (रा.चाफ्याचा पाडा, जोरण, सटाणा, नाशिक) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी एक हजार ३१ वाहने,३९ गुन्हेगार, १०३ हॉटेलचीही तपासणी केली. मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या १०३ जणांविरुद्ध कारवाई आणि दारुबंदी कायद्यान्वये ३० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोटर वाहन कायद्यान्वये १४९ जणांवर कारवाई करुन एक लाख २३ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकाच रात्रीतून झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.