नाशिक – नाशिक महापालिका निवडणुकीच्या काही दिवस आधी पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द कठोर भूमिका घेतल्याने पोलिसांची ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अशी ओळख सर्वत्र झाली होती. या कारवाईत सत्ताधारी पक्षांशी संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीलाही सोडण्यात न आल्याने पोलिसांविषयी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, निवडणूक संपताच गुन्हेगारांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिकमध्ये निर्माण झालेले वातावरण सत्ताधाऱ्यांना महापालिका निवडणुकीत त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपूर्वी गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्यात आली होती की काय, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. कारण, निवडणूक संपताच गुंडांचे कोयते, तलवारी पुन्हा बाहेर आले आहेत.
विशेष म्हणजे, नाशिक शहर पोलिसांना सापडत नसलेला गुन्हेगार हर्षद पाटणकर शहरातच विरुध्द गटाच्या सराईतावर हल्ल्याचा प्रयत्न करतो, वाहनांची तोडफोड करतो, असे प्रकार सुरु आहेत. गुंड हर्षद पाटणकरने पोलिसांना पुन्हा आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. पाटणकरने पंचवटीतील मोरे मळा (हनुमानवाडी) परिसरात रविवारी दुसऱ्या टोळीतील सराईतावर हल्ला केल्याने पोलिसांच्या कार्यपध्दतीवरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. गंगापूर भागातील जाधव-पवार आणि पाटणकर टोळीत वर्चस्ववादातून वितूष्ट आहे. याच वादातून रविवारचा हल्ला झाल्याचे म्हटले जाते.
तक्रारदार निलेश रणमाळे हा सराईत असून तो मोरे मळा परिसरात असताना हर्षद पाटणकर आणि टोळीने त्याचा ‘गेम’ करण्यासाठी हल्ला चढवला. परंतु, निलेश पळाल्याने बचावला. पाटणकर टोळीने परिसरातील वाहनांचे नुकसान केले. पाटणकर अनेक महिन्यांपासून पोलिसांना सापडत नसला तरी तो नाशिकमध्येच राहून गुन्हेगारी कारवाया करीत असल्याने पोलिसांना कसा सापडत नाही, पोलिसांना आव्हान देणाऱ्या हर्षद पाटणकरवर कोणाचा वरदहस्त आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हर्षद पाटणकरविरुद्ध नऊपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असून त्याला तडीपारही करण्यात आले होते. जबर दुखापत, चोरी, हत्येचे प्रयत्न, शस्त्र बाळगणे, गोळीबार असे गुन्हे त्याच्याविरुध्द आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाटणकरला २०२३ मध्ये कारागृहात स्थानबद्ध केले होते. कारागृहातून सुटका झाल्यावर पाटणकरची कारमधून शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोरुन मार्गस्थ झाली होती. परंतु, त्याक्षणी मिरवणूकअडविण्याची हिंमत पोलिसांनी केली नव्हती. तक्रारीनंतर पाटणकरला अटक करण्यात आली होती.
जुलै २०२४ मध्ये पाटणकरची कारागृहातून सुटका झाली. परंतु, पुन्हा त्याने गुन्हेगारी कारवाया सुरु केल्या. वेदांत चाळगे, गोपाळ नागोरकर आणि शॉन मायकल हे पाटणकर टोळीत आहेत. एप्रिल २०२४ मध्ये कामटवाड्यात अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली होती. ती पाटणकरच्या सांगण्यावरुन झाल्याचा संशय आहे. जानेवारीत लेखानगरात कारची तोडफोड, गोळीबाराचा दावा करण्यात आला. याप्रकरणातही पाटणकर टोळीविरुद्ध गुन्हा आहे. ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अजूनही आहे, हे दाखवून देण्यासाठी नाशिक शहर पोलिसांवरील जबाबदारी अधिक वाढली आहे.
