लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : जिल्ह्यात घंटागाडीच्या अनियमिततेविरोधात नागरिकांमधील नाराजी यावल येथे उघडकीस आली. ओला व सुका कचरा संकलन करण्याची घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने यावलकरांनी घरातील कचऱ्याचे डबे थेट नगरपालिकेसमोर ठेवत संतप्त भावना व्यक्त केल्या.
यावल येथे ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी संबंधित ठेकेदार आपल्या सोयीनुसार एक-दोन दिवसांआड आणि अनियमितपणे घंटागाडी फिरवीत आहे. त्यामुळे घराघरांत ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात साचला जातो. यामुळे यावलकर वैतागले आहे. अखेर नियमितपणे घंटागाडी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी आपापल्या घरातील कचऱ्याचे डबे उचलून नगरपालिका कार्यालयासमोर आणून निषेध व्यक्त केला.
आणखी वाचा-नाशिक : पतीच्या अंगावर साप सोडून मारण्याचा प्रयत्न
नगरपालिका मुख्याधिकार्यांनी लक्ष केंद्रित करून ओला व सुका कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे देयकापोटीची रक्कम अदा करू नये, तसेच दर महिन्याला दिलेली रक्कम वसूल करावी, अशी यावलकराकंडून होत आहे. ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी नगरपालिकेने भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्यावर कोणी तक्रार केल्यास ओला व सुका घनकचरा वाहतूक करणारा ठेकेदार तक्रारदारांना दादागिरी दमदाटी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याकडे मुख्याधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी यावलकरांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली.