नाशिक : नाशिक हे देशातील एक महत्त्वाचे धार्मिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असतानाही येथून राजस्थानमधील प्रमुख शहरांसाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे होणारे हाल आता संपण्याची चिन्हे आहेत. नाशिक ते जोधपूर आणि बीकानेर अशी थेट रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी राजस्थान- हरियाणा- गुजरात प्रवासी संघाच्यावतीने केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना नुकतेच एक सविस्तर निवेदन देण्यात आले. या मागणीची गांभीर्याने दखल घेत लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन शेखावत यांनी दिले आहे.

केंद्रीय मंत्री शेखावत हे अलीकडेच नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रवासी संघाने त्यांची भेट घेऊन नाशिक-राजस्थान रेल्वेसेवेची आग्रही मागणी केली. ​नाशिक शहर आणि परिसरात राजस्थान, हरियाणा आणि गुजरात राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक आहेत. व्यापार, उद्योग आणि धार्मिक कारणांमुळे या नागरिकांचा आपल्या मूळ राज्याशी सतत संपर्क असतो. प्रवासी संघाचे प्रतिनिधी तेजपालसिंह सोढा यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, नाशिकमधून जोधपूर किंवा बीकानेरकडे जाण्यासाठी एकही थेट रेल्वे गाडी उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा महागडा प्रवास करावा लागतो किंवा मुंबई-सुरत मार्गे वळसा घालून जावे लागते. या प्रवासात ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. थेट रेल्वे सुरू झाल्यास केवळ प्रवाशांची सोय होणार नाही, तर दोन्ही राज्यांमधील व्यापार वृद्धीलाही मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

​निवेदनातील मुद्द्यांचे गांभीर्य ओळखून मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सकारात्मक भूमिका घेतली. नाशिकचे वाढते महत्त्व आणि प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता, ही मागणी रास्त असल्याचे त्यांनी मान्य केले. केंद्र सरकारच्या पातळीवर या प्रस्तावाचा पाठपुरावा करून तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी आपण स्वतः रेल्वे मंत्र्यांकडे आग्रह धरू, असे आश्वासन त्यांनी दिले.

​या प्रसंगी तेजपालसिंह सोढा यांच्यासह राजेंद्र फड, महेंद्रसिंह राजपूत, सज्जन सिंह, बजरंग शर्मा, राजेंद्र सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्र्यांच्या या ठोस आश्वासनामुळे नाशिकमधील राजस्थानी समाजात समाधानाचे वातावरण असून अनेक वर्षांची ही प्रतीक्षा आता संपेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.