नाशिक – डिसेंबर महिन्यात थंडीची तीव्रता वाढू लागल्याने शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये हिवाळी फॅशनने चांगलीच रंगत आणली आहे. स्वेटर, जॅकेट, हूडी, मफलर, शाल आणि लोकरीच्या कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. यंदा उबदारपणाबरोबरच आकर्षक डिझाइन आणि आरामदायी फॅशनकडे ग्राहकांचा विशेष कल आहे.

मागील काही दिवसांपासून शहर तसेच ग्रामीण भागात थंडीचा तडाखा जाणवण्यास सुरूवात झाली. नाशिककरांना थंडीचे नाविन्य नाही. मात्र तापमानाचा वाढता पारा पाहता काही दिवसांपासून थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. त्यामुळे सकाळी उबदार कपड्यांची सोबत असल्याशिवाय घराबाहेर पडता येत नाही. यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी पाहता बाजारपेठेत विविध वयोगटानुसार वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

महिलांसाठी लाँग कोट, कार्डिगन, स्टोल, शाल आणि लोकरीचे टॉप्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. साडी किंवा कुर्त्याबरोबर शाल आणि स्टोल परिधान करण्याची फॅशन पुन्हा लोकप्रिय होत असून पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून येतो. पुरुषांमध्ये फुलस्लीव्ह स्वेटर, नेहरू जॅकेट, लेदर आणि पफर जॅकेट्सना अधिक मागणी आहे. तरुणाईमध्ये हूडी आणि कॅज्युअल जॅकेट्स लोकप्रिय ठरत आहेत. लहान मुलांसाठी रंगीबेरंगी वूलन सूट, कॅप, मोजे आणि हातमोजे यांची खरेदी वाढली आहे. पालकांकडून उबदार आणि त्वचेस सुरक्षित कपड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे थंडी पासुन कानांचे संरक्षण व्हावे, यासाठी खास सशाचे कान आले आहेत. टोपीला असलेल्या दोन वेण्या ओढल्या की कान वर जातात. या प्रकाराचे लहानांपासून मोठ्यांना प्रचंड आकर्षण आहे. साधारणत: २०० रुपयांपासून पुढे याची विक्री सुरू आहे.

यंदा काळा, राखाडी, मरून, नेव्ही ब्ल्यू आणि तपकिरी या रंगांना अधिक पसंती मिळत आहे. त्याचबरोबर लोकरीचे मोजे, हातमोजे, बीनी कॅप आणि बूट्स यांसारख्या ॲक्सेसरीजची विक्रीही वाढली आहे. थंडीमुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर, क्रीम यांच्याही विक्रीत वाढ झाल्याचे दिसते. दुसरीकडे, थंडीच्या तडाख्यात वाढणारी भूक लक्षात घेता आजीबाईच्या बटव्यातून खास सुकामेवा वापरत तयार करण्यात आलेले डिंकाचे लाडू तयार करण्याची लगबग वाढली आहे. यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घनकर गल्ली, बोहोरपट्टीसह किराणा मालाच्या दुकानातून आर्थिक अंदाज बघत लाडु सामान तयार करण्याची खरेदी वाढली आहे. डिंक लाडुमुळे महिन्याचे अंदाजपत्रक बिघडत आहे.

आगामी आठवड्यांत थंडीचा जोर वाढल्यास हिवाळी कपड्यांच्या खरेदीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळी फॅशनमुळे बाजारपेठेत पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले असून व्यापारालाही चालना मिळाली आहे.