नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या नगर जिल्ह्यातील उमेदवाराने माघार घेतली. गेल्या आठवड्यात संबंधिताने अर्ज भरू नये म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयात दबावतंत्राचा अवलंब होऊन त्याला धक्काबुक्की झाल्याची तक्रार अन्य उमेदवाराने केली होती. निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगणाऱ्या दराडे किशोर प्रभाकर यांनी रिंगणातून माघार घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. आतापर्यंत चार उमेदवारांनी माघारी घेतली असून बुधवारी माघारीची अंतिम मुदत आहे.

या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यातील नगरच्या कोपरगाव येथील दराडे किशोर प्रभाकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य साधणारे संगमनेर येथील संदीप गुळवे, मालेगाव येथील शेख मुख्तार अहमद व येवला येथील रुपेश लक्ष्मण दराडे या उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

हेही वाचा – नाशिक: अज्ञात भ्रमणध्वनीच्या भडिमाराने नाशिकच्या ‘हंप्राठा’तील प्राध्यापक का त्रस्त आहेत ?

हेही वाचा – बैलांना वाचविले; पण शेतकर्‍याचा बुडून मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील रेल्वे बोगद्यातील पाण्यातून बैलगाडी काढताना घटना

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या एकाने तर ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या तिघांनी अर्ज दाखल केले होते. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या उमेदवारामुळे त्यांचे मताधिक्य एक लाखाने कमी झाले होते. प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी शिक्षक मतदारसंघात तसाच प्रयोग करण्याची तयारी अनेकांनी केल्याचे दिसते. त्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून संदीप गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य साधणारे संदीप भिमशंकर गुळवे, संदीप नामदेव गुळवे आणि संदीप वामनराव गुरुळे हे तीन अपक्ष तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या किशोर प्रभाकर दराडे यांनी अर्ज दाखल केला होता. यातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या प्रत्येकी एका उमेदवाराने माघार घेतली. यामुळे शिवसेना शिंदे गटासमोर नाम साधर्म्याची अडचण दूर झाली असली तरी शिवसेना ठाकरे गटासमोर एकसारख्या नावाचे दोन उमेदवार आहेत. संबंधितांच्या माघारीसाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचे सांगितले जाते. माघारीसाठी १२ जूनपर्यंत मुदत आहे.