नाशिक: महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणारा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा गोदा महोत्सव २०२६ आणि विभागीय मिनी सरस मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला नाशिककरांचा प्रतिसाद लाभला. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात ८६ लाखांहून अधिकची उलाढाल झाली.

येथील डोंगरे वसतिगृह मैदानात भरविण्यात आलेल्या या महोत्सवात नाशिक जिल्ह्यासह विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील महिला स्वयंसहायता समूहांनी सहभाग घेतला होता. एकूण १८५ दालनांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये १४० वस्तू विक्रीचे तर ४५ पारंपरिक ग्रामीण खाद्यपदार्थांचे दालन होते. हस्तकला, हस्तव्यवसाय, घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, शेवया, पापड, सेंद्रिय उत्पादने, सजावटीच्या वस्तू तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तूंना नागरिकांकडून विशेष मागणी होती. गोदा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीची अस्सल चव अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळाली. पारंपरिक जेवणाच्या दालनांना मोठी गर्दी झाली होती. कुटुंबीयांसह नागरिकांनी या महोत्सवाला भेट देत महिला उद्योजिकांना प्रोत्साहन दिले.

या महोत्सवात चार दिवसांत एकूण ८६ लाख ३२ हजार ४१३ रुपयांची उलाढाल झाली असून, ही उलाढाल महिला स्वयंसहायता समूहांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरली आहे. बचत गटाच्या सर्व महिलांनी महोत्सवाची जबाबदारी पेलली. खरेदी- विक्रीत ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले. सुविधाही बचत गटाने उपलब्ध करून दिल्याने ई-व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले. थेट विक्रीमुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली असून, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळाले आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी मेहनत, कौशल्य आणि चिकाटीने तयार केलेली उत्पादने शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचली, गोदा महोत्सव २०२६ केवळ प्रदर्शन व विक्रीपुरता मर्यादित न राहता, महिलांच्या स्वावलंबनाचा आणि आर्थिक सक्षमीकरणाचे सशक्त व्यासपीठ ठरले आहे. भविष्यात देखील महिला स्वयंसहाय्यता गटांना उमेद अभियानाच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.

नाशिक येथील गोदा महोत्सवात १०० हून अधिक बचत गट सहभागी झाले. यातील काही ग्रामीण तसेच दुर्गम भागातील होते. यामध्ये कोकणमधील काही बचत गट सहभागी झाले. मसाल्यासह अन्य खाद्य पदार्थांची रुचकर चव लक्षात घेता काहींनी थेट घाऊक प्रमाणात खरेदीची नोंदणी केली. यातील बचत गट मुंबई येथे होणाऱ्या सरस बचत गट प्रदर्शनात सहभागी होतील.