धुळे – शिक्षक पती, पत्नीचे थकीत वेतन देण्यासाठी दोन लाख रुपयाची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>> नाशिक-कनाशी बसला अपघात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झाला आहे. परंतु, हे थकीत वेतन त्यांना मिळाले नाही. या संदर्भात त्यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांची भेट घेतली होती. तेव्हा तक्रारदार व त्यांची पत्नी यांना ही रक्कम देण्यासाठी गिरी यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
हेही वाचा >>> मालेगावातील पश्चिम भागात बंदचा परिणाम
कार्यालयात दोन लाख रुपये स्वीकारत असताना गिरी यांना पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा परिवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे यांनी तपासी अधिकारी रूपाली खांडवी यांच्यासह सापळा पथकातील राजन कदम, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली.