नाशिक : जिल्ह्यातील कहांडोळपाडा ग्रामपंचायत अंतर्गत पिंपळपाडा हा २१ घरे आणि १०६  लोकसंख्या असलेला पाडा आहे. पाडय़ातील विहीरीने तळ गाठल्याने महिलांना पाण्यासाठी जंगलातील आसराचा नाला या ठिकाणी खोल दरीत उतरुन झऱ्याचे पाणी घ्यावे लागत आहे. पाडय़ावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा पोहचलेल्या नाहीत. गावात ना शाळा, ना अंगणवाडी. गावात रस्ताच नाही. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी रुग्णाला न्यावयाचे असल्यास डोंगर चढून रस्ता गाठावा लागतो. या पाडय़ाचा उन्हाळय़ात पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे पाडय़ापासून दोन किलोमीटरवरील जंगलात असलेला आसराचा नाला. या नाल्यात दोन फूट खोल असलेल्या झऱ्यावर गावाची तहान भागवली जाते. महिलांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागत आहे. जंगलात जंगली जनावरे आढळतात. गावात लवकरात लवकर पाण्याची सोय व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जल परिषदेचे मित्र पोपट भांगरे, तुळशीराम भांगरे, सुनील भांगरे आदींनी गावाची पाहणी केली.