नाशिक – वय आणि ताकद यांचा स्वसंरक्षणात अडथळा ठरत नाही, हे छत्रपती शिवरायांच्या काळापासून महाराष्ट्राला ज्ञात आहे. छत्रपती शिवराय आपल्या कितीतरी शत्रुंपेक्षा वयाने लहान होते. परंतु, स्वसंरक्षण कसे करायचे, याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. त्यामुळेच त्यांनी बलाढ्य शत्रुंना लोळवले. महाराष्ट्रातील आजच्या मुलींनीही तोच आदर्श घेतला आहे. नाशिक येथील आठवीतील एका मुलीने नुकतेच ते दाखवून देताना केरळच्या धिप्पाड युवकाला जमिनीवर लोळविण्याची किमया केली.

नाशिक येथील ‘गोल्डन होरायझन स्कूल’मधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अदिबा खान हिने प्रत्यक्ष कृतीतून स्वसंरक्षण कसे करावयाचे ते दाखवून दिले. भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, ‘माय भारत’ कार्यालय नाशिकतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र-केरळ आंतरराज्य युवा सांस्कृतिक आदान-प्रदान’ कार्यक्रमांतर्गत ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळेत हा चित्तथरारक प्रसंग घडला. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या क्विक रिस्पाॅन्स टीमचे प्रशिक्षक आणि भारत सरकारचे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मोहम्मद आरिफ खान यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. गेल्या ३३ वर्षांपासून मुलींना मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण देणाऱ्या खान यांनी यावेळी तांत्रिक कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले.

केरळमधील ३७ प्रतिनिधींपैकी एका युवकाने ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळेत शंका उपस्थित केली. तो म्हणाला, “एका लहान मुलीला धिप्पाड व्यक्तीवर विजय मिळवणे कसे शक्य आहे?” त्याच्या शंकेचे निरसन करण्यासाठी प्रात्यक्षिक सादर करण्याची परवानगी जिल्हा युवा अधिकारी अशोक मेघवाल यांच्याकडे मोहम्मद आरिफ खान यांनी मागितली. त्यानुसार खान यांनी ‘गोल्डन होरायझन स्कूल’मधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अदिबा खान हिला केरळच्या पथकातील धिप्पाड युवकावर ‘होल्ड आणि लॉक’ तंत्राचा प्रयोग करण्यास सांगितले. अदिबाने अवघ्या काही सेकंदातच त्या युवकाचा पाय ‘लॉक’ करून त्याला जमिनीवर लोळवले. हे पाहून उपस्थित पाहुणे आणि सहभागी युवक थक्क झाले.

यावेळी सानिया खान आणि गोपकुमार यांनी देखील विविध आक्रमक पकडींपासून सुटका मिळविण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. ‘मार्क मार्शल आर्ट्स’चे मुख्य उद्दिष्ट महिलांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव करण्यास सक्षम करणे हे आहे. केरळचे हे पथक २४ फेब्रुवारीपर्यंत नाशिकच्या संस्कृतीचा आणि विविध उपक्रमांचा अनुभव घेण्यासाठी शहरात मुक्कामी आहे. “प्रत्येक मुलीमध्ये असा आत्मविश्वास निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे की, संकटकाळी ती स्वतःचा जीव वाचवू शकेल,” असे प्रतिपादन आरिफ खान यांनी केले. या विनिमय कार्यक्रमामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीबरोबरच राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षाविषयक जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.