scorecardresearch

त्र्यंबकेश्वर गाभाऱ्यात महिलांना प्रवेशासाठी स्वराज्य संघटनाही मैदानात

गाभाऱ्यात जोपर्यंत प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याच्या भूमिकेवर संबंधित महिला ठाम राहिल्या.

त्र्यंबकेश्वर गाभाऱ्यात महिलांना प्रवेशासाठी स्वराज्य संघटनाही मैदानात

शनिशिंगणापुरात परिवर्तनाची गुढी उभारली गेल्यानंतर शनिवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात स्वराज्य संघटनेच्या महिलांनी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. तथापि, विश्वस्तांनी या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याने काही दिवस प्रतीक्षा करावी, अशी विनंती केली. गाभाऱ्यात जोपर्यंत प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याच्या भूमिकेवर संबंधित महिला ठाम राहिल्या. रात्री उशिरापर्यंत विश्वस्त व संबंधितांमध्ये चर्चा सुरू होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना परवानगी मिळाल्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानने या विषयावर पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचे संकेत दिले. मंदिराच्या रूढी व परंपरांचे जतन व्हावे, हे कारण देऊन स्थानिकांनी महिलांना त्र्यंबक मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश देण्यास विरोध केला आहे. ही बाब लक्षात घेऊन देवस्थानने शनिवारपासून स्थानिकांशी चर्चा सुरू केली. सायंकाळी पुणे येथील स्वराज्य संस्थेच्या वनिता गट्टे यांच्या नेतृत्वाखाली सात महिला त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाल्या. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, अशी त्यांची मागणी होती. या वेळी देवस्थान व्यवस्थापनाने पुरुष व महिलांना गाभाऱ्यात प्रवेश बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले. महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याबाबत देवस्थान लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे सर्व भाविक ज्या ठिकाणाहून दर्शन घेतात, तिथून दर्शन घ्यावे, अशी विनंती करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधितांनी गाभाऱ्याबाहेरून दर्शन घेतल्याचे विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी सांगितले. तथापि, या संदर्भात गट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यावर आम्ही ठाम असल्याचे स्पष्ट केले. जोपर्यंत गाभाऱ्यातील प्रवेश खुला केला जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-04-2016 at 01:36 IST

संबंधित बातम्या