scorecardresearch

कर्ज वसुलीसाठी महिला पथक

३१ मार्च अजून १५ दिवस दूर असताना जिल्हा बँकेला सुमारे ७०० कोटी रुपयांची कर्ज वसुली पूर्ण होईल की नाही, याची चिंता आहे.

जिल्हा बँकेकडून उपाययोजना; मार्च अखेपर्यंत ७०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट

नाशिक: ३१ मार्च अजून १५ दिवस दूर असताना जिल्हा बँकेला सुमारे ७०० कोटी रुपयांची कर्ज वसुली पूर्ण होईल की नाही, याची चिंता आहे. कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने वेगवेगळय़ा उपायांचा अवलंब सुरू केला आहे. त्यासाठी बँकेने आता महिला पथकांवरही कर्ज वसुलीचा भार टाकला आहे. त्यासाठी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १० पथके तयार करण्यात आली असून त्यांना जिल्ह्यात वसुलीसाठी पाठविण्यात येत आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाते. शेतकऱ्यांशी संबंधित बहुतेक आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेमार्फतच होत असतात. त्यामुळे बँकेला शेतकऱ्यांची आणि ल्या बँकेची कायम गरज भासत असते. शेतकऱ्यांसह इतरही अनेक जण जिल्हा बँकेकडून वेगवेगळय़ा कारणांसाठी कर्ज घेत असतात. परंतु, कर्ज मिळाल्यानंतर अनेकांकडून त्याची परतफेड करण्याकडे हलगर्जीपणा केला जातो. त्यामुळे जिल्हा बँकेपुढील अडचणींमध्येही वाढ होत जाते. राज्य बँकेची देणी, ठेविदारांच्या ठेवी देण्यातही समस्या निर्माण होते.

जिल्हा बँकेकडून मध्यम मुदत, पीक कर्ज यासाठी घेतलेल्या कर्जाची थकबाकी सुमारे २२०० कोटी आहे. ३१ मार्च अखेपर्यंत ४० टक्के कर्ज वसुली बँकेला पूर्ण करावयाची आहे. त्यात अपयश आल्यास बँकेपुढील अडचणींमध्ये अधिक वाढ होऊ शकते. थकबाकीचे अधिक प्रमाण असलेल्या तालुक्यांवर बँकेने विशेष लक्ष दिले आहे.

वसुलीसाठीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जोरकस प्रयत्न करुनही फारशी प्रगती होत नसल्याने उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकेकडून आता वेगवेगळय़ा मार्गाचा अवलंब करण्यात येऊ लागला आहे. वसुलीसाठी बँक मुख्यालयातील सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामाला लावण्यासह बँकेने महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची १० पथके तयार केली आहेत. या पथकांकडून बँकेला अधिक वसुली होऊ शकेल, असा विश्वास आहे. 

पथकाविरोधात उलटसुलट प्रतिक्रिया

वसुलीसाठी गावागावात जाणाऱ्या महिला पथकांविषयी कर्जदारांना वेगवेगळा अनुभव येत आहे. दिंडोरी तालुक्यातील कर्जदारांकडे वसुलीसाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या पथकाविरोधात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असल्या तरी ३१ मार्चपर्यंत किमान ४० टक्के वसुलीचे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवलेल्या जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी वसुली सुरुच राहील, असा निर्धार व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women squad debt recovery measures district bank ysh

ताज्या बातम्या