गोदावरीला तब्बल पाच महापूर आलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यात यंदा भयाण पाणीटंचाई अनुभवायला मिळतेय. मेटघर गावातल्या महिलांंना चक्क पन्नास फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागतेय. मात्र, कधीही बांधावर न गेलेल्या प्रशासनाला या तीव्रतेची जाणीव नसल्याचं दिसतंय. हे पाहून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत.

मालेगाव, मनमाडसह इतर तालुक्यालाही यंदा मुसळधार पावसाने झोडपले. अजूनपर्यंत अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू होता, पण अनेकांच्या नशिबी असलेली पाण्याची फरफट अजून काही केल्या थांबली नाही. महिलांना ५० फूट खोल विहिरीतून उतरून, जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे सटाणा तालुक्यातील रातीर येथे संतापलेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकत ग्रामसेवक व सदस्यांना कोंडले आहे.

तालुक्यातील रातीर, सुराणे, रामतीर आदी खेड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरतेय, पण ढीम्म प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील देवना साठवण तलावासह २१ योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व योजनांसाठी शासनाकडून २८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या योजना कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे.