scorecardresearch

महिला दिनानिमित्त कर्तृत्वाला विविध कार्यक्रमांतून मुजरा सन्मान

सन्मान सोहळा, व्याख्यान, सायकल फेरी, आरोग्य वाण, आरोग्य शिबीर अशा विविध कार्यक्रमांनी शहरासह जिल्ह्यात महिला दिन संस्था, संघटनांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिक येथे जिल्हा खो खो संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित १५ वर्षांआतील मुलींच्या स्पर्धेप्रसंगी सुशीला राका या एके काळच्या खेळाडूने वयाच्या नव्वदीतही आपल्यात खो खो खेळातील रग कशी ठासून भरली आहे, ते दाखविताना मुलींना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे खांबावर गडी बाद करण्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखविले. (छाया- सचिन निरंतर)

सोहळा, व्याख्यान, सायकल फेरी, आरोग्य वाण, आरोग्य शिबीर आदींची आयोजन

नाशिक : सन्मान सोहळा, व्याख्यान, सायकल फेरी, आरोग्य वाण, आरोग्य शिबीर अशा विविध कार्यक्रमांनी शहरासह जिल्ह्यात महिला दिन संस्था, संघटनांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. व्यावसायिकांनीही महिला दिनानिमित्त गृहउपयोगी वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे आदींच्या खरेदीवर आकर्षक सवलत दिल्याने बाजारपेठेतील गजबजही वाढली होती. 

लायन्स क्लब नाशिक-पंचवटी संस्थेच्या वतीने महिला आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी आरोग्य वाण देण्यात आले. गंगापूर रोडवरील ९५ वर्षांच्या पार्वती शिंदे या आरोग्यदायी आजींचा सन्मान करण्यात आला. १५० हून अधिक महिलांनी आरोग्य शिबिराचा फायदा घेतला. रक्तशर्करा तसेच हाडांची ठिसूळता यांची तपासणी करण्यात आली. अल्प दरात औषध वाटप करण्यात आले. या वेळी वैद्य विक्रांत जाधव, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांसह अन्य उपस्थित होते. प्रशांत सोनजे यांनी आभार मानले. चांदोरी येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित महिला दिन कार्यक्रमास प्राचार्य डॉ. आर. के. दातीर, उपप्राचार्या तथा अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. जी. सावंत आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सावंत यांनी महिला आणि पुरुष यांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, हा महिला दिनाचा हेतू असल्याचे सांगितले. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी महिला प्राध्यापक तसेच स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डी. एन. खैरनार यांनी केले. आभार प्रा. पी. पी. आहेर यांनी मानले. श्री साई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सावित्री गौरव पुरस्काराचे वितरण शेफाली भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास आ. देवयानी फरांदे, कोंडाजी आव्हाड, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अजय फडोळ आदी उपस्थित होते. या वेळी आमदार फरांदे यांनी सावित्रीबाई शिकल्यामुळेच आज आपल्यापर्यंत शिक्षण पोहचले असल्याचे सांगितले.

भुजबळ यांनी काम करताना प्रत्येकाने पुढे काय हा प्रश्न स्वत:ला विचारावा. आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा बाऊ करण्यापेक्षा ती आव्हाने म्हणून स्वीकारण्याचा कानमंत्र दिला. पुरस्कारार्थी पोलीस निरीक्षक संगीता निकम यांनी समाजाने स्त्री-पुरुष समानता स्वीकारल्यास महिला दिनाची गरज भासणार नसल्याचे सांगितले. आव्हाड यांनी पुरस्कार ही शाबासकीची थाप असली तरी यामुळे जबाबदारी वाढली असल्याचे नमूद केले. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. नाशिक मर्चन्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने माजी महापौर शोभा छाजेड, रजनी जातेगावंकर आदींच्या उपस्थितीत वेगवेगळय़ा क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. अस्मिता ढोकरे-मोरे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कामाच्या व्यापात आपल्या आरोग्यासाठी वेळ काढा, मुलांशी खेळणे, भटकंती, सायकल चालवणे तुमच्या पसंतीनुसार ठरवा. तुमचे आरोग्य अबाधित राहिले तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील याकडे त्यांनी लक्ष वेधले. काही सामाजिक संस्थांच्या वतीने महिलांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी घेण्यात आली. युनिक ग्रुपच्या वतीने महिलांनी बनवलेल्या खाद्य पदार्थाची जत्रा, लेझीम प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय शहर परिसरातील सराफ व्यावसायिक, कापड, गृहउपयोगी सामानाचे विक्रेते यांनी खरेदीवर आकर्षक सवलत जाहीर केली. हॉटेल व्यावसायिकांनीही महिलांसाठी वेगवेगळय़ा योजना जाहीर करत गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Womens day occasion honored various programsorganizing camps ysh

ताज्या बातम्या