जळगाव : १४ नोव्हेंबर रोजी जागतिक डायबेटीस म्हणजेच मधुमेह दिन आहे. रक्तातील वाढत्या साखरेचे प्रमाण ही जागतिक समस्या झाली असताना, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून आहाराचे पथ्य पाळण्याविषयी नेहमीच सूचना दिल्या जातात. दरम्यान, मधुमेहींनी केळी खावी की नाही, या बद्दल अनेक वेळा शंका उपस्थित केल्या जातात. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’ ने जळगावमधील जे.पी.पी प्राकृतिक चिकित्सा आणि योग केंद्रांच्या संस्थापक आहार तज्ज्ञ डॉ. सोनल महाजन यांच्याशी संवाद साधला.

भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, पुढील काही वर्षांत भारत देश मधुमेहाची जागतिक राजधानी ठरेल, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. सध्या देशात १० कोटींपेक्षा जास्त नागरिक मधुमेहाने प्रभावित आहेत, तर सुमारे १३ कोटी नागरिक प्रिडायबिटीक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चिंताजनक परिस्थितीचा विचार करून मधुमेहाविषयी व्यापक जनजागृती करण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली आहे.

मधुमेहाचे व्यवस्थापन करणे बऱ्याचवेळा आव्हानात्मक असू शकते, विशेषतः जेव्हा संतुलित आहारासाठी योग्य पदार्थ निवडण्याची वेळ येते. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी कोणती फळे सर्वोत्तम आहेत हा एक प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. मधुमेही फळे खाऊ शकतात; परंतु, त्यांनी ती कोणत्या प्रकारची आणि किती प्रमाणात खावीत याची जाणीव ठेवणे गरजेचे असते. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते. परंतु, फळे मानवी शरीराला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर यांसारखे आवश्यक पोषक घटक देखील प्रदान करतात.

अशाच प्रकारे भरपूर पोषण मूल्य आणि पोट भरण्याचे समाधान मिळत असल्यामुळे केळी हे फळ एक वरदान ठरते. परंतु, मधुमेहींनी केळी खाऊ नये, असा समज अनेक लोकांमध्ये पसरलेला दिसतो. खरे तर केळीमध्ये असलेली शर्करा ही नैसर्गिक असल्यामुळे शरीर त्याला सहजपणे पचवू शकते. अर्थात, शरीराद्वारा केळी पचविण्यासाठी इन्शुलिनचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा लागतो.

त्यामुळे मधुमेही रुग्णांनी चांगली भूक लागली असताना दोन केळी खाल्ली तर चालते. मात्र, त्यानंतर थोड्या शारीरिक हालचालींची आवश्यकता असते. तसेच केळी बरोबर एखाद-दोन लवंग खाता आल्या तर केळी अधिक सुपाच्य होऊन त्यातील शर्करेचा शरीरावर विपरीत परिणाम होत नाही. केळीसोबत लवंग खाल्ल्याने कफ होण्याची भीती सुद्धा राहत नाही, असे आहार तज्ज्ञ डॉ. सोनल महाजन म्हणाल्या.

रात्रीच्या वेळी केळी कधीही खाऊ नये. केळीचे शिकरण किंवा फ्रुट सॅलड, कोशिंबीर करून खाण्यापेक्षा केळी नुसतीच खावीत. त्यामुळे केळी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. केळी किती खावी याबद्दल तसे पाहता सामान्य व्यक्तींसाठी कोणतेही बंधन नाही. लहान मुले पोटभर केळी खाऊ शकतात. उलट त्यांच्यासाठी असे करणे अधिक आरोग्यदायी ठरते. खेळ, शारीरिक श्रम, व्यायाम करणाऱ्यांनी इतर कोणतीही फळे खाण्यापेक्षा केळी खाणे अधिक लाभदायक ठरते.

केळी खाताना ती पूर्णतः पिकलेली, गोड आणि मऊ झाली आहेत, याची खात्री करून घ्यावी. हल्ली केळींना काही रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवले जाते. मात्र, तशी केळी आरोग्याच्या दृष्टीने घातक असते. नैसर्गिकरित्या पिकवलेली सामान्य तापमानातील शीतगृहात न साठवलेली, साल किंचित पिवळसर होऊन त्याच्यावर लहान लहान तपकिरी ठिपके आलेली घडातून पटकन सुटणारी केळी खाणे प्रकृतीसाठी उत्तम मानले जाते. एक मध्यम आकाराची केळी साधारणतः २८ ग्रॅम कार्बोदके, १५ ग्रॅम शर्करा, एक ग्रॅम प्रथिने आणि तीन ग्रॅम चोथा अर्थात फायबर्स देते. एका केळीपासून शरीराला जवळजवळ १०५ कॅलरीज उष्मांक मिळतात, असेही आहार तज्ज्ञ डॉ. महाजन यांनी सांगितले.