नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे भारतातील आघाडीचे ‘फ्युचर ऑफ लर्निंग’ आहे. हे विद्यापीठ आपल्या विविध शिक्षणक्रम आणि शैक्षणिक आदान प्रदान व्यवहारात डिजीटल तंत्रज्ञानाचा मोठ्या कौशल्याने वापर करत आहे. त्यामुळे हे विद्यापीठ लोक विद्यापीठाचा दर्जा कायम राखतांनाच शैक्षणिक विश्वात ‘ग्लोबल मॉडेल’ बनण्याकडे वाटचाल करत आहे, असे गौरवोद्गार भारत सरकारचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह व न्याय विभाग) तथा राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मलजित सिंह कलसी यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा विद्यापीठ आवारात मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. कलसी यांचे दीक्षान्त भाषण झाले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्यासह दोपलीच्या डॉ. बाळासाहेब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डॉ. संजीवनी महाले, डॉ. अक्षया निकुंभ, डॉ. अनिल गावित, डॉ. प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.
डॉ. कलसी यांनी, वैविध्यपूर्ण शिक्षणक्रम, दर्जेदार पाठ्यपुस्तके, परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करणे, गुणपत्रिका व प्रमाणपत्रासाठी अत्याधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर अशी ही विद्यापीठाची प्रगती थक्क करणारी असल्याचे सांगितले. जगभरात उच्च शिक्षणाची व्याख्या बदलत असून त्यात मुक्त विद्यापीठांचे महत्व वाढत आहे. मुक्त विद्यापीठे ही आता दुय्यम पर्याय राहिली नसून सर्वसमावेशकतेची आणि राष्ट्रीय क्षमतावृद्धीची अग्रणी केंद्रे झाली आहेत. आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकत राहणे, कुठल्याही एका गोष्टीत प्राविण्य मिळविणे, तंत्रज्ञानाला आपला स्नेही बनवणे, स्वत:विषयी इतरांमध्ये विश्वास निर्माण करणे, इतरांशी तुलना न करता आपले प्रामाणिक योगदान, नितीमूल्यांशी तडजोड न करणे व सदैव सेवाव्रती राहणे ही यशाची सप्तसूत्री असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी, काळाची गरज ओळखत विद्यापीठाने तीन महिने कालावधीपासून वर्षभर मुदतीचे विविध नवीन अभ्यासक्रम सुरु केल्याची माहिती दिली. ऑनलाईन शिक्षणक्रमांची संख्या शंभरच्यावर नेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. विद्यापीठ स्थापनेपासून एकूण ४५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घेतला आहे. डिजिटल ओळखपत्र असलेले ‘यशकार्ड’ हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. वाढवण बंदर प्रकल्पासाठी विद्यापीठाचा २०३० पर्यंत तीन लाख कुशल मनुष्यबळ प्रशिक्षणाचा मानस त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी अष्टमी माशालकर (बी.ए.), विनोद बेतागर (बी. लिब.), हरिश येरणे ( जनसंज्ञापण व पत्रकारिता), साईनाथ भूतडा (एम. बी. ए.), काजल राउत (एम. कोम), शीतल शेलार (बी. कॉम), आरती कोल्हे (एम. ए. शिक्षणशास्त्र), प्रतिमा कस्तुरे (बी.ए. शिक्षणशास्त्र ), सिल्व्हेरिया व्हिन्सेंट मायकल (बी.सी.ए.), शुमैला जबीन हमजा खान (एम. एस्सी. भौतिकशास्त्र), स्मिता पवार (एम. एस्सी. गणित) या ११ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले. तसेच अष्टमी माशालकर या विद्यार्थिनीस प्रातिनिधिक स्वरूपात ब्लॉकचेन तंतज्ञानवर आधारित क्युआर कोड असलेल्या पदवीची डिजिटल प्रत प्रमुख अतिथी डॉ. कलसी यांच्याहस्ते देण्यात आली. सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि दत्ता पाटील यांनी केले.
मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभांप्रसंगी विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमांतील एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली गेली. त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्या पदवीधारकात ६० वर्ष वयावरील २०८ विद्यार्थी, ७७ दृष्टीबाधित विद्यार्थी, विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेले ६८ बंदीजन यांचा समावेश होता. १ लाख २३ हजार ९२१ पैकी पदविकाधारक १२ हजार ६३७, पदवीधारक ९० हजार ७०८, पदव्युत्तर पदवीधारक २० हजार ५७१, पीएच. डी. धारक – ५ विद्यार्थी. ७१ हजार ७९१ पुरुष व ५२ हजार १३० स्त्री विद्यार्थी यांचा समावेश होता.

