नाशिक: येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुढाकाराने चार महिन्यात महाराष्ट्रातील विविध १२ ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात आले. या माध्यमातून एक हजाराहून अधिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मुक्त विद्यापीठाच्या वतीने १२ डिसेंबर २०२५ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत १२५ दिवसात आयोजित या मेळाव्यांद्वारे १६३० युवांना ५० नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली.

या मेळाव्यांसाठी २१ हजार ७९७ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पाच हजार ५७ जण मुलाखतीस उपस्थित होते. निवड झालेल्या उमेदवारांना प्रारंभी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एक लाख ८० हजार ते दोन लाख ६४ हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. विद्यापीठाने या रोजगार मेळाव्याची वाढती मागणी लक्षात घेता आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय ३६ ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.

कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेनुसार १२ डिसेंबर २०२५ पासून विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयापासून रोजगार मेळावा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यापीठाची ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखा आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे मेळावे घेण्यात आले. प्राथमिक नियोजनानुसार विद्यापीठाच्या आठ विभागीय केंद्रांतर्गत प्रत्येकी एक असे आठ रोजगार मेळावे घेण्यात येणार होते.

परंतु, काही अभ्यासकेंद्रे व प्रशासन यांच्या आग्रहस्तव त्यांची संख्या वाढून १२ करण्यात आली. यासाठी नाशिक, अमरावती, पालघर, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, नागपूर, बीड, कोल्हापूर, पालघर, बालेवाडी – पुणे, नांदेड, गडचिरोली या ठिकाणी हे रोजगार मेळावे झाले. त्यात मुलाखतीस ३० हजारांहून अधिक उमेदवार उपस्थित होते. गडचिरोली पोलीस दल प्रशासनाच्या ”पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून ”प्रोजेक्ट उडान” अंतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यास युवक – युवतींचा भरघोस प्रतिसाद मिळत नामांकित कंपन्यांकडून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील १२७८ सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

रोजगार मेळाव्यांद्वारे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव मिळाला, रोजगार, आंतरवासियता (इंटर्नशिप) आणि करिअर पर्यायांची माहिती मिळाली. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनादेखील लगोलग आंतरवासियताची संधी प्राप्त झाल्यामुळे त्यांना भविष्यात प्रगतीची अधिक संधी आहे. कंपन्यांना देखील कुशल, उद्योगानुरूप आणि प्रशिक्षित मनुष्यबळ प्राप्त झाले. विद्यापीठ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हानिहाय रोजगार मेळावे आयोजित करणार असून त्याचे नियोजन सुरु आहे.

  • प्रा. संजीव सोनवणे (कुलगुरु, मुक्त विद्यापीठ)