नाशिक – दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, फराळ, भेटवस्तू आणि शुभेच्छांची देवाणघेवाण. मात्र यंदा नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात दिवाळीच्या निमित्ताने झालेली राजकीय फटाकेबाजी काहीशी वेगळीच चर्चेचा विषय ठरली आहे. फटाके आकाशात फुटत असताना राजकीय फटाके मात्र मतदारसंघाच्या चौकाचौकांत फुटताना दिसत आहेत.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे पाच पंचवार्षिकपासून प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ करत आहेत. तर मतदारसंघात त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे सक्रिय आहेत. त्यांच्याविरोधात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे दराडे कुटुंबीयांच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच नांदगावचे शिंदे गटाचे आमदार आणि छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांनी यंदाच्या दिवाळीत थेट येवला लासलगाव मतदारसंघातच शुभेच्छांचा ‘धडाका’ लावल्याने राजकीय चर्चांची आतषबाजी जोरात सुरु आहे.

आमदार सुहास कांदे यांनी संपूर्ण येवला मतदारसंघात दिवाळी शुभेच्छांचे फलक लावले आहेत, पदाधिकाऱ्यांनी घराघरांत शुभेच्छा पत्रिकांचे वाटप केले. त्यामुळे येवल्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्या खऱ्या; पण राजकीय निरीक्षकांच्या डोक्यात मात्र वेगळेच फटाके फुटू लागले आहेत. येवल्याच्या राजकीय मैदानात कुणाल दराडे यांची एन्ट्री होण्याची चर्चा असताना सुहास कांदे यांनी या मतदारसंघात राजकीय चाचपणी सुरू केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दराडे यांच्या उमेदवारीच्या चर्चेला कांदे यांच्या दिवाळी मोहिमेमुळे नवा ट्विस्ट मिळाला आहे का, की हा केवळ सणासुदीच्या शुभेच्छांचा सामाजिक उपक्रम आहे, अशीही चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, दिवाळीच्या फराळात चकली, करंजी आणि लाडू असले तरी येवल्याच्या राजकीय चर्चेत मात्र उमेदवारी, मतदारसंघ आणि राजकीय समीकरणांचाच खमंग फराळ रंगला आहे. त्यामुळे यंदा येवल्यात दिवाळीच्या शुभेच्छा कोणाकडून आल्या, यापेक्षा त्या शुभेच्छांमागे आगामी राजकारणाचे काही संकेत आहेत का, याचीच चर्चा अधिक रंगताना दिसत आहे.